
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत अर्जेंटिनाचा महानायक लिओनेल मेस्सी आघाडीवर आहे. इजिप्तविरुद्धच्या 3-2 अशा थरारक विजयात मेस्सीने स्पर्धेतील आपला आठवा गोल झळकावत अव्वल स्थान पटकावले.
अटलांटा येथे झालेल्या या सामन्यात अर्जेंटिना 0-2 अशा पिछाडीवर असताना मेस्सीने संघाला बरोबरी करून देणारा महत्त्वाचा गोल केला. त्यानंतर अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या गोलमुळे मेस्सीने फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे आणि नॉर्वेचा आर्ंलग हालांद यांना मागे टाकले. अंतिम सोळा फेरीपूर्वी मेस्सी, एम्बाप्पे आणि हालांद या तिघांच्या खात्यात प्रत्येकी सात गोल होते, मात्र इजिप्तविरुद्धच्या गोलमुळे मेस्सी आठ गोलांसह एकटाच आघाडीवर गेला आहे. इंग्लंडचा हॅरी केन सहा गोलांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पेनचा मिकेल ओयार्झाबाल आणि फ्रान्सचा उस्मान डेम्बेले यांनी प्रत्येकी चार गोल करत शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे.
‘गोल्डन बूट’ कसा ठरतो?
विश्वचषक स्पर्धेअखेरीस सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन बूट’ पुरस्कार दिला जातो. दोन किंवा अधिक खेळाडूंचे गोल समान असल्यास सर्वाधिक ‘असिस्ट’ करणाऱ्या खेळाडूला प्राधान्य दिले जाते. गोल आणि असिस्ट दोन्ही समान असल्यास कमी वेळ खेळून ती कामगिरी करणारा खेळाडू विजेता ठरतो. कतारमधील 2022 च्या विश्वचषकात फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने आठ गोल करत ‘गोल्डन बूट’ पटकावला होता.
दुसऱ्या ‘गोल्डन बूट’च्या शोधात तिघे
किलियन एम्बाप्पे, हॅरी केन आणि कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज हे दुसऱ्यांदा ‘गोल्डन बूट’ जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. केनने 2018 च्या रशिया विश्वचषकात, तर रॉड्रिग्जने 2014 च्या ब्राझील विश्वचषकात हा किताब जिंकला होता. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला ‘गोल्डन बूट’ दोनदा जिंकता आलेला नाही. त्यामुळे एम्बाप्पे आणि केनसमोर इतिहास रचण्याची संधी आहे.
एका विश्वचषकात सर्वाधिक गोलांचा विक्रम
एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनच्या नावावर आहे. त्यांनी 1958 मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या विश्वचषकात तब्बल 13 गोल केले होते.
‘गोल्डन बूट’ शर्यतीतील आघाडीचे खेळाडू
खेळाडू देश गोल असिस्ट
लिओनेल मेस्सी अर्जेंटिना 8 1
किलियन एम्बाप्पे फ्रान्स 7 2
एार्ंलग हालांद नॉर्वे 7 0
हॅरी केन इंग्लंड 6 1
उस्मान डेम्बेले फ्रान्स 4 2
मिकेल ओयार्झाबाल स्पेन 4 1
विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल
n लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 21 गोल
n किलियन एमबाप्पे (फ्रान्स) 19 गोल
n मिरोस्लाव क्लोझा (जर्मनी) 16 गोल
n रोनाल्डो (ब्राझील) 15 गोल
n हॅरी केन (इंग्लंड) 14 गोल.




























































