आझाद मैदानात शिक्षकांचा सरकारविरोधात एल्गार, अशैक्षणिक कामांमुळे गुरुजींचा ताण वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळा व शिक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात आज शिक्षकांनी आझाद मैदानात ‘शाळा बंद’ आणि ‘सामूहिक रजा’ आंदोलन छेडत सरकारविरोधात  घोषणाबाजी करत एल्गार पुकारला.

या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण सीनिअर शिक्षक पृती समिती, महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, प्रहार शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना यांसारख्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.

राज्य निवडणूक आयोगाने दैनंदिन शैक्षणिक काम करून उरलेल्या वेळात बीएलओ, एसआयआर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काही ठिकाणी बीएलओ, एसआयआरचे काम करण्यासाठी पूर्ण वेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी हे काम शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रमुख मागण्या

  1. टीईटी परीक्षा ही उपयोजन-केंद्रीत असावी, ती नव्याने तयार केली जावी. ज्यामुळे ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होणे शक्य होईल, अशी व्यवस्था करावी.
  2. शिक्षकांना मतदार यादी पुनरीक्षण आणि ‘एसआयआर’च्या कामांतून वगळण्यात यावे.
  3. सेवा पूर्व परीक्षा देऊनही शिक्षकांना परीक्षेच्या नावाखाली वेठीस धरले जाते. तामीळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र, ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावी.
  4. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन संच मान्यता रद्द करावी.