
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणारे शिक्षणतज्ञ व पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आज वांगचुक यांची उपोषण स्थळी भेट घेतली. परीक्षांमधील घोळ आणि लाखो विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासावर शिवसेना संसदेत आवाज उठवेल व वांगचुक यांच्या आंदोलनाकडेही सरकारचे लक्ष वेधेल, असा शब्द त्यांनी या वेळी दिला.
नीट, सीबीएसईसह केंद्रीय स्तरावरील अनेक परीक्षांमध्ये झालेल्या घोळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या सगळ्याची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधानांनी स्वतः त्यांना तसे आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे. या मागणीला पाठिंबा देत वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागील 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी वांगचुक यांची भेट घेतली.
धर्मेंद्र, देवेंद्र, नरेंद्र… सगळीकडे गडबड
लवकरच संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार परीक्षांतील घोटाळ्यावर शिवसेना संसदेत आवाज उठवेल. या विषयावर मी पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. हा प्रस्ताव स्वीकारला जाईल की नाही माहीत नाही. पण आवाज उठवत राहू, असे अरविंद सावंत म्हणाले. सरकारच्या प्रतिनिधींनी उपोषण स्थळी आलेच पाहिजे. एका राजीनाम्यासाठी तुम्ही जिवाशी खेळणार का, असा सवाल सावंत यांनी केला. देवेंद्र, धर्मेंद्र, नरेंद्र… नावात इंद्रवाले सगळे गडबडवाले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
- उद्धव ठाकरे यांनी आज सोनम वांगचुक यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिवसेनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांना दिली. ‘हे निर्दयी सरकार आहे. समाजातील चांगल्या आणि देशप्रेमी माणसांची, त्यांच्या न्याय्यहक्कांची सरकारला किंमत नाही. इतक्या दिवसांनंतरही सरकारचा प्रतिनिधी इकडे फिरकलेला नाही यावरून काय ते ओळखा. तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी या वेळी सीजेपीचे अभिजीत दीपके यांच्याशीही संवाद साधला.



























































