
मिसिंग लिंक दुर्घटनेवरून वादळ उठलं असताना सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणाऱ्या घटनांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अचानक उड्डाणपुलाचा काही भाग ढासळला. भरावाचा मोठा भाग कोसळून त्यात दोन महिला जखमी झाल्या. वर्षभरापूर्वीच हा पूल उभारण्यात आला होता. दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरही नागोठण्यात अवघ्या चार महिन्यांत पूल दुभंगला. या घटनांवरून समाजमाध्यमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. ‘ही महाराष्ट्राची बदनामी नाही का?, ‘देश जानना चाहता है…देवाभाऊ, हे ‘भाडे के टट्टे’ कोण आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला जात आहे.
चार महिन्यांतच दुभंगला पूल
तुफानी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात नॅशनल हायवेने केलेल्या झोलची पोलखोल झाली आहे. पनवेलपासून इंदापूरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असतानाच नागोठण्याजवळ उभारलेला एक फ्लायओव्हर दुभंगला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या पोटात अपघाताच्या भीतीने अक्षरशः गोळा आला. यानंतर हा फ्लायओव्हर तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला व वाहतूक पर्यायी सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकनंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचे पितळ उघडे पडल्याने सरकारच्या विकासकामांचा ढोल फुटला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून रोज लाखो प्रवाशी येथून जातात. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे प्रवाशांना मनस्ताप होत असतानाच आज एका प्रवाशाला नागोठण्यातील मीरा नगर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हरलाच मोठे भगदाड पडल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून पुलाच्या काँक्रीटवरील गॅप वाढत चालली होती. अखेर नॅशनल हायवे ऑथोरिटीच्या अधिकाऱयांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने वाहतूक बंद केली. महामार्ग बांधण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च झाले. पण थोड्याच कालावधीत ऐन पावसाळ्यात पुलाला भगदाड पडल्याने निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
तात्पुरती मलमपट्टी
नागोठण्यातील पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी व तंत्रज्ञ यांनी धाव घेतली. त्यानंतर तकलादू दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती पूर्ण होताच पुन्हा वाहतूक सुरू केली असली तरी प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































