
चीनच्या फुजियान प्रांतात चप्पल कारखान्यात गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचावकार्य तीव्र करण्याचे, घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, फुजियान प्रांतातील जिनजियांग शहरात गुरुवारी दुपारी आग लागली. आगीमुळे काही लोक छतावर अडकले होते. आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. प्राथमिक तपासानुसार आग कारखान्याच्या तळमजल्यावर लागली होती. इमारतीत ठेवलेले बूट बनवण्याचे साहित्य अत्यंत ज्वलनशील होते, ज्यामुळे आग वेगाने पसरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फुजियान प्रांतात असलेले शिनजियांग हे बूट आणि कपड्यांच्या उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आहे. याला चीनची “शू कॅपिटल” म्हणून संबोधले जाते.



























































