
डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी मार्ड छत्रपती संभाजीनगर आणि फायमा इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून शांततापूर्ण आंदोलन केले.
रुग्णांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेत डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आंतररुग्ण विभाग (आयपीडी), आपत्कालीन सेवा (अपघात विभाग) तसेच इतर सर्व वैद्यकीय सेवा अखंडितपणे सुरू ठेवल्या. कोणतीही आरोग्य सेवा बंद न ठेवता डॉक्टरांनी आपला निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, समुदाय वैद्यक विभागाच्या नियमित आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत घराघरांत जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा देतानाही निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. रुग्णालयात आणि समाजात सेवा बजावत असतानाही डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात आपली एकजूट आणि ठाम भूमिका त्यांनी यावेळी अधोरेखित केली. या आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी हल्लेखोरांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व ‘फायमा’चे को-चेअरमन डॉ. स्वप्निल केंद्रे आणि ‘मार्ड’ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष व फायमा नॅशनल एक्झिक्युटिव्ह डॉ. चैतन्य ढावरे, डॉ. शुभम सावळकर (जनरल सिक्रेट मार्ड) यांनी केले. यामध्ये मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले.




























































