
पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे घडलेल्या हत्येच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असतानाच अशाच प्रकारे हिंदुस्थानी तंत्रज्ञाने अमेरिकेत पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. लग्न होऊन केवळ चार महिने झाले असतानाच 30 वर्षीय तंत्रज्ञाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचा फोटो प्रेयसीला पाठवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्याकांड घडून नऊ महिने झाल्यानंतर याचा उलगडा झाला आहे. अमेरिकेतील घरामध्ये मृतदेह आढळला होता. 30 वर्षीय आरोपी अविनाश नरणेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून 2025 मध्ये 27 वर्षीय राजिता सब्बिननीसोबत विवाहित असताना अविनाश नरणेचे हिंदुस्थानातील एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सॉफ्टवेअर विकास अभियंता नरणेने पोलिसांना कॉल केला आणि पत्नी बाथरूममध्ये बंद असून ती बाहेर पडणार नसल्याचे कळवले. जेव्हा पोलिसांनी बाथरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना सबिनेनी जमिनीवर पडलेली आढळली. अधिकाऱ्यांनी तिला घटनास्थळी मृत घोषित केले. त्यावर चौकशीदरम्यान नरणे याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, 27 ऑक्टोबर रोजी आपण कामासाठी बाहेर गेलो होता. त्यानंतर 40 मिनिटांनंतर घरी परतला, तेव्हा त्याला सॅबिनेनी बाथरूममध्ये लॉक असल्याचे लक्षात आले. मात्र, नरणे घराबाहेर असताना त्यांच्या घरात कोणीही प्रवेश करताना अधिकाऱ्यांना आढळले नाही. यावरून हत्या करण्यात आल्याचा संशय बळावला होता. दुसऱ्या दिवशी किंग काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने सबिनेनीचा मृत्यू हत्या असल्याची पुष्टी दिली. सबिनेनीचा मृत्यू गळा दाबल्मुळे झाल्याचे किंग काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले. त्याच आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करीत अमेरिकेतील तंत्रज्ञ असलेल्या हिंदुस्थानी तरुणाला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.
























































