
संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा कडेला मोठ्या प्रमाणात भाग खचल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या भेगा दिवसेंदिवस वाढत असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडील मातीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्त्याचा पाया कमकुवत झाला असून, विशेषतः वळणाच्या ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसात हा धोका आणखी गंभीर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे लक्ष अनेक वेळा या समस्येकडे वेधले असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची पाहणी करून खचलेल्या भागाची दुरुस्ती, संरक्षण भिंत उभारणे तसेच आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेळीच दखल घेतली नाही तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
























































