
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात कार्यरत असलेले गट विकास अधिकारी (बीडीओ) मनोज कुमार यांच्या पत्नी अमृता कुमारी यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला हुंडाबळीचा आरोप असलेले प्रकरणाला आता लग्नाआधीच्या प्रेमप्रकरणामुळे नवे वळण लागले आहे. मुझफ्फरपूर पोलिसांनी या प्रकरणात बेगुसराय येथे कार्यरत असलेल्या एएसआय अनु कुमारी यांना मनोज कुमार यांच्यासोबत अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने बीडीओ मनोज कुमार यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर एएसआय अनु कुमारी यांची पीआर बाँडवर सुटका केली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, तपासादरम्यान मोबाईल चॅट्स, कॉल डिटेल्स, लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारखे तांत्रिक पुरावे समोर आले आहेत, असे मुझफ्फरपूर पोलिसांनी सांगितले. या पुराव्यांच्या आधारे बीडीओ आणि एएसआय अनु कुमारी यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. सुरुवातीला दोघांनीही आरोप नाकारले, मात्र तांत्रिक पुरावे सादर झाल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले.
मनोज कुमार आणि अनु कुमारी यांच्या प्रेमसंबंधाबाबत अमृताला कळल्यानंतर तिने याला विरोध केला. यानंतर मनोज कुमारने तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा अमृताच्या कुटुंबियांनी आरोप केला. हुंड्याची मागणी आणि प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे अमृताला विष देऊन ठार मारण्यात आले, असाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तपासादरम्यान, अमृताच्या मृत्यूच्या दिवशी बीडीओ मनोज कुमार आणि एएसआय अनु कुमारी हे कथितरित्या पाटणा येथे उपस्थित होते, असेही पोलिसांना आढळून आले. अमृताने त्या दिवशी तिला व्हिडिओ कॉल केले होते, असे प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे. कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल डेटाचीही तपासणी केली जात आहे.
मनोज कुमार आणि अनु कुमारी यांची भेट मुझफ्फरपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना झाली होती. त्यानंतर ते संपर्कात राहिले. दरम्यान, अमृता आणि अनु कुमारी यादेखील कॉलेजमधील मैत्रिणी असल्याचे म्हटले जाते. मनोज आणि अमृता यांचे डिसेंबर 2022 मध्ये लग्न झाले, परंतु त्यानंतरही ते संपर्कात राहिले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. या फुटेजमध्ये अमृतावर हल्ला होत असल्याचे दिसत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर काही आरोपींची नावेही दिसत असून, त्यांचा शोध सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे.



























































