
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असताना, देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देशात पेट्रोलची किंमत ८२ रुपये प्रति लिटर असावी, अशी मागणी केली आहे. तसेच E20 पेट्रोलची किंमत ७० रुपये प्रति लिटरपर्यंत कमी होऊ शकते, असा दावा त्यांनी एका सविस्तर गणितासह केला आहे.
केजरीवालांनी मांडले पेट्रोलच्या किमतीचे गणित
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सध्याच्या इंधनाच्या किमतींवरून केंद्र सरकारला घेरले आहे. ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ११५ डॉलर्सवरून घसरून ७० डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. विनिमय दरानुसार (Exchange Rate) विचार केल्यास, ही किंमत ४२ रुपये प्रति लिटर इतकी होते. या ४२ रुपयांवर सध्याचे सर्व शुल्क जसेच्या तसे ठेवले, तरीही पेट्रोल स्वस्त होऊ शकते.”
त्यांनी मांडलेले गणित खालीलप्रमाणे:
- कच्चे तेल: ४२ रुपये/लिटर
- रिफायनिंग, ओएमसी (OMC) मार्जिन आणि वाहतूक: ९ रुपये/लिटर
- केंद्रीय कर: १२ रुपये/लिटर
- व्हॅट (VAT): १६ रुपये/लिटर
- डीलर कमिशन: ३ रुपये/लिटर
- एकूण: ८२ रुपये/लिटर
यानुसार ग्राहकांना ८२ रुपये लिटरने शुद्ध पेट्रोल मिळायला हवे आणि E20 (इथेनॉल मिश्रित) पेट्रोल याहूनही स्वस्त, म्हणजे जवळपास ७० रुपये प्रति लिटर दराने मिळायला हवे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यास साहजिकच देशातील वाढती महागाई कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तेल कंपन्यांच्या नफ्याबाबत बोलताना केजरीवाल यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. युद्धाच्या काळात तेल कंपन्यांना झालेल्या तोट्याची भरपाई आता नफा कमावून केली जात असल्याचा युक्तिवाद सरकार करू शकते, मात्र तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे केजरीवाल म्हणाले.
“२०१४ पासून आतापर्यंत तब्बल सहा वेळा कच्च्या तेलाच्या किमती लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. तरीही सरकारने इंधनाचे दर कमी न करता बंपर नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच तेल कंपन्यांना तब्बल ७७ हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याचे समोर आले आहे. असे असताना सध्या जनतेकडून प्रति लिटर १०२ रुपये वसूल करणे खूप जास्त आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने तातडीने किमती कमी करून पेट्रोल ८२ रुपयांवर आणावे,” अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.


























































