
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत ‘मिसिंग लिंक’बद्दल बोलणाऱ्यांचा उल्लेख ‘भाडे के टट्टू’ असा केला होता. तसेच महाराष्ट्राचा अपमान कराल तर मी बघून घेईल, असा इशाराही दिला होता. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘मिसिंग लिंक’बद्दल बोलले तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. रेल्वे कामगार सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यावर राजकारण करू नका म्हणणारे इतकी वर्षे काय करत होते? स्वत:च्या अंगाशी आल्यावर राजकारण करू नका म्हणतात. केंद्र सरकारच्या गोष्टींबद्दल बोलले की तुम्ही देशविरोधी आहात असे म्हणतात. केंद्र सरकारची कामं आहेत, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंकबद्दल बोलले तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही विचारायचे नाही का? इतके दिवस भाजपचे लोक विरोधकांना मोबाईलवरून शिव्या घालत होते, वाटेल ते लिहित होते. आता याच्या दामदुप्पटीने यांच्या अंगावर येत असल्याने यांना त्रास व्हायला लागला आहे, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलले तर म्हणे धर्माचा अपमान. चोरी आहे ती, त्यात धर्म कुठे आला? आम्हालाही राम मंदिराबद्दल आस्था आहे. तिथे 1400 कोटी रुपये चोरले गेलेत. वक्फ बोर्डामध्ये चोऱ्या झाल्या त्याबद्दल तुम्ही बोलला नाहीत, असे प्रश्न आम्हाला विचारतात. वक्फ बोर्डाचे आम्हाला काय देणेघेणे. राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकले, श्रद्धेने मंदिरासाठी दिले त्याची चोरी होत असेल तर त्याबद्दल बोलायचे नाही का? असा सवाल करत राम मंदिरात चोरी झाल्याचे पहिल्यांदा भाजप खासदारानेच उघड केल्याचे राज ठाकरे म्हणाले. राम मंदिरात 15 ट्रस्टी असून त्यातील 12 केंद्र सरकार नेमते. हे सर्व आरएसएस, विश्व हिंदू परिषद, भाजपशी संबंधित आहेत. आता तिथे दुसऱ्याचे कुणाचे सरकार असते आणि चोरी झाली असती तर यांनी मोर्चे काढले असते, असेही राज ठाकरे म्हणाले.
मिसिंग लिंकचे कुणी राजकारण करत असेल तर त्याला बघून घेऊ, असे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये म्हणाले. हे वाक्य संपल्यासंपल्या हिंदीतून बोलायला सुरू झाले. कुणासाठी हिंदी बोलले? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा आणि तिथे आमचे मुख्यमंत्री हिंदीत बोलत आहेत. कुणाला सांगायचे होते? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचे असेल की बघून घेईल, असेही राज ठाकरे म्हणाले.
‘मिसिंग लिंक’बद्दल बोलले तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल pic.twitter.com/tRRshMuJ7P
— Saamana Online (@SaamanaOnline) July 9, 2026






























































