शिक्षकांनाच TET सक्तीची का? अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी परीक्षा का नाही? संतप्त शिक्षकांचा धरणे आंदोलनात सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फक्त शिक्षकांनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी टिईटी परीक्षा सक्तीची का? मग अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी टिईटी सारखी परीक्षा का घेतली जात नाही? असा संतप्त सवाल शिक्षकांनी आजच्या धरणे आंदोलनात केला. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आज शाळा बंद आंदोलन करत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन केले. शिक्षकांनी जिल्हापरिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला होता.

टिईटीच्या अनिवार्यते विरोधात शिक्षकांनी आंदोलन केले.सेवाज्येष्ठ शिक्षकांना टिईटी नियमात शिथिलता आणावी. तामिळनाडू,तेलंगणा आणि उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या आणि सध्या सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानसिक व शारीरिक व्याधी तसेच प्रदीर्घ सेवा विचारात घेऊन टिईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या नियमात बदल करावेत. कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी टिईटी उत्तीर्णची अट ४० टक्के गुणावर शिथिल करावी किंवा त्यांच्यासाठी ते शिकवत असलेल्या इयत्तांवर आधारित समकक्ष परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती पत्रानुसार शिक्षण संचालक पुणे राज्यात सुरू केलेली विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती संधी संदर्भ क्र.२ च्या पत्रानुसार सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती पात्रता धारण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. यानिर्णयाच्या अधीन राहून जे सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र आहेत आणि ज्यांनी इतर सर्व शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्या आहेत त्यांना नैसर्गिक न्यायानुसार पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी व शाळा विरोधी संच मान्यता धोरण रद्द करावे ही मागणी आंदोलनात करण्यात आली.बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांची पुर्णपणे मुक्तता करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली. यावेळी शिक्षक समन्वय समिती समन्वयक दिलीप देवळेकर, शिक्षक समिती अध्यक्ष दिलीप महाडिक, शिक्षक परिषद अध्यक्ष प्रकाश काजवे, कास्ट्राईब संघटना अध्यक्ष संतोष कांबळे, जुनी पेन्शन संघटना अध्यक्ष अंकुश चांगण.शिक्षक संघ अध्यक्ष दीपक नागवेकर,तुकाराम कुवळेकर, बळीराम मोरे, दीपक शिंदे, विलास जाधव, संतोष उतेकर, संतोष पावणेव इतर शिक्षक उपस्थित होते.