Dapoli News – दापोलीत नव्याने बांधलेली संरक्षण भिंत कोसळली, घरांनाही धोका; फॅमिली माळ परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली शहरातील फडके दवाखाना गल्ली परिसरातील फॅमिली माळजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा एक मोठा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही भिंत याच २०२६ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिंतीला मोठे नुकसान झाले असून तिचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. उर्वरित भिंतीलाही तडे गेल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भिंत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिंतीलगत असलेल्या घरांनाही यामुळे धोका निर्माण झाला असून, आणखी काही भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे माती खचत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य धोका लक्षात घेत नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या. भिंतीजवळ अनावश्यक वर्दळ करू नये तसेच धोकादायक भागापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळाली.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भिंतीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून त्यामध्ये अनेक ठिकाणी तडे दिसून येत आहेत. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित भिंतही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आजूबाजूच्या घरांना आणि तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या भिंतीचे एवढ्या कमी कालावधीत नुकसान झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सततच्या पावसाचा फटका बसला असला तरी नव्याने उभारलेली भिंत इतक्या लवकर कोसळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि उर्वरित धोकादायक भाग तातडीने हटवून सुरक्षित संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

सध्या दापोली तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि संरक्षक भिंतींचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.