
इराणवरील अमेरिकेच्या ताज्या हवाई कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. दोन्ही देशांमधील शांतता करार संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने बुधवारी इराणमधील चाबहार, बुशेहर आणि बंदर अब्बास येथील महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडून झालेल्या एका हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने 20 पट ताकदीने उत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या तीन बोटींवर हल्ला केला होता आणि त्याचाच बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यातही इराणने अमेरिकेवर असा कोणताही धाडसी हल्ला केल्यास त्याला 20 पट अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल आणि अमेरिका प्रत्येक वेळी अधिक ताकदीने समोर येईल, असा इशाराच दिला आहे.
अमेरिकेने मंगळवारीही इराणमधील 80 हून अधिक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या पुढील लष्करी कारवाईबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, लष्करीदृष्ट्या अमेरिका आधीच वरचढ ठरली असून इराणकडे आता प्रतिकार करण्यासाठी फारसे काही उरलेले नाही. दरम्यान, इराणकडून नुकताच अमेरिकेशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करार हवा आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, इराण या कराराचे प्रामाणिकपणे पालन करेल का, याबाबत आपल्या मनात शंका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी स्पेन देशाचाही विशेष उल्लेख केला. स्पेनसोबत काही मतभेद असल्याचे मान्य करत, अखेर स्पेनने अमेरिकेच्या आर्थिक मागण्यांना मान्यता दिल्याचा दावा त्यांनी केला; अन्यथा त्यांच्याशी चर्चा करण्याची गरजच भासली नसती, असेही ते म्हणाले. युरोपमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि इराणच्या सद्यस्थितीचा संदर्भ दिला. सैन्य माघारी घेण्याबाबतचा पुढील निर्णय हा पूर्णपणे आगामी परिस्थितीवर अवलंबून असेल, असे त्यांनी नमूद केले. सध्या इराणच्या मुद्द्यावर जगातील अनेक देश अमेरिकेच्या मदतीसाठी पुढे येत असले, तरी महासत्ता असलेल्या अमेरिकेला आता कोणत्याही देशाच्या मदतीची गरज नाही, असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी शेवटी व्यक्त केला.



























































