जाऊ शब्दांच्या गावा – दोन डोळे शेजारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

‘डोळे हे जुल्मी गडे’, ‘डोळे तुझे बदामी’, ‘डोळ्यात वाच माझ्या’, ‘तुझ्या डोळ्यांत माझं मन दिसतंय’, ‘डोळ्यांपुढे दिसे गे मज चित्र ते सजीव’, ‘तुझे डोळे पाण्याने भरले’, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘डोळे कशासाठी?’ ही नुसती गीतं नव्हेत; तर ती प्रेमाची परिभाषा आहे. प्रेमच काय, मानव सगळा जीवनानुभव डोळ्यांद्वारेच घेत असतो.

‘डोळे’ या अवयवाला संस्कृतमध्ये ‘नेत्र’, ‘नयन’, ‘अक्ष’, ‘चक्षू’, ‘लोचन’ असे अनेक शब्द आहेत. यांतील ‘अक्ष’पासून आलेला ‘आंख’ शब्द हिंदी व गुजरातीत वापरला जातो, तर सिंधीमध्ये ‘अख’, पंजाबीत ‘अक्ख’, बंगाली व उडियामध्ये ‘आखी’ असे उच्चार आहेत. मराठीतील काही लोकगीतांमध्ये ‘आखी ल्याहिली काजळ’ असा उल्लेख आहे, पण महाराष्ट्राच्या बऱयाच ग्रामीण भागांत ‘आख’ शब्द डोळ्यांजवळील हाडाला अनुलक्षून वापरला जातो. विशेषतः डोळा आणि कान यांच्या मधल्या भागाला ‘आख’ म्हटलं जातं. उदा. आख मोडणं. पूर्वी डोकेदुखी बरी होण्यासाठी आखावर बिब्ब्याच्या फुल्या दिल्या जात.

बऱयाच भारतीय भाषांमध्ये ‘आंख’ शब्द सर्रास वापरला जात असताना मराठीत ‘डोळा’ शब्द कसा आला, याविषयी सांगताना वि. का. राजवाडे म्हणतात. संस्कृत ‘लोचनक’पासून लोअणअ – डोअलअ – डोळा असं रूप झालं. पुढे राजवाडे ज्ञानेश्वरीतील ‘डोल हलणे’ हे उदाहरण देतात – ‘जो अवयव पाहण्यासाठी हलतो तो डोला – डोळा’. ही व्युत्पत्ती कृ. पां. कुलकर्णी यांना शंकास्पद वाटते. ते म्हणतात, डोळा हा शरीरावयववाचक शब्द द्राविडमूळ असावा. कानडीमध्ये ‘डोळा’ व गुजरातीमध्ये ‘डोळो’ असे शब्द आहेत. अर्वाचीन मराठीत ‘डोळस’ म्हणजे डोळे शाबूत असलेला किंवा चतुर, तर यादव काळात ‘डोळस’ म्हणजे चांगल्या डोळ्यांचा, सुंदर असा अर्थ होता. मात्र कुलकर्णींनी उल्लेख केलेला कानडीतील ‘डोळा’ शब्द ‘कन्नड-मराठी कोशा’त आढळत नाही.

डोळ्यांचं कामच पाहणं असल्यानं नजर, दृष्टी, लक्ष, कटाक्ष या अर्थाने तो वापरणं ओघाने आलंच. आपले कितीतरी वाक्प्रचार या अर्थाची साक्ष देतात. उदा. डोळे फुटणं, डोळे फोडून वाचणं, डोळा चुकवणं, डोळा ठेवणं, डोळेझाक करणं, डोळे ताणून पाहणं, डोळे भरून पाहणं, डोळे मोडणं, डोळ्यांआड होणं, डोळ्यांच्या खाचा होणं, डोळ्यांपुढं अंधेरी येणं, डोळ्याला डोळा भिडवणं इ.

डोळे आणि अश्रू यांचंही अनेक शब्दप्रयोगांतून खास नातं दिसतं. उदा. डोळ्यांत पाणी येणं, डोळे टळटळीत भरणं, डोळे भरून येणं, डोळे पुसणं, डोळ्यांतून पाणी काढणं, डोळ्यांना पदर लावणं, डोळ्यांत टिपं येणं, डोळ्यांत गंगायमुना येणं इ. झोप यायला लागली की, डोळे आपोआप मिटायला लागतात. यावरून ‘डोळा लागणं’ किंवा ‘डोळ्याला डोळा लागणं’ म्हटलं जातं. शांत, गाढ झोप येते तेव्हा ती ‘डोळाभर झोप’ असते. नुकसान झाल्यावर अनुभवानं शहाणं होणं म्हणजे ‘डोळे उघडणं’. हा शब्दप्रयोग याउलटही वापरला जातो. उदा. दोन-तीन दिवस सतत पाऊस लागून राहिला तर ‘पाऊस डोळा उघडत नाहीये’ म्हटलं जातं.

मरण्यापूर्वी एखाद्या गोष्टीची इच्छा धरणं किंवा एखाद्याच्या भेटीकरिता, त्याला पाहण्याकरिता जीव धरून ठेवणं म्हणजे ‘डोळ्यांत प्राण ठेवणं’. मृत्यू जवळ आला की, माणूस शुद्ध हरपू लागतो, त्याचा चेहरा, डोळ्यांची बुबुळं पांढरीफटक दिसायला लागतात. यावरून भीतीमुळे होणाऱया मरणोन्मुख अवस्थेला ‘डोळे पांढरं करणं’ म्हणतात.

मनातील इच्छा पूर्ण झाली की, समाधान वाटतं. अशा वेळी डोळे निवतात किंवा डोळ्यांचं पारणं फिटतं. डोळ्यांत धूळ टाकली असता दिसत नाही. त्यामुळे फसवणूक करणं या अर्थानं ‘डोळ्यांत धूळ टाकली’ म्हणतात. शेजारी राहत असूनही क्वचितच भेटत असलेल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी ‘दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी’ ही म्हण आहे. चिपडं येऊन डोळे लाल होणं म्हणजे ‘डोळे येणं’.

डोळे हा विविध भावविभ्रम दाखवणारा अवयव होय. राग व्यक्त करण्यासाठी डोळे उगारणं, डोळे मोठं करणं, डोळे लाल करणं, डोळे पिंजारणं, डोळे फिरवणं असे कितीतरी शब्दप्रयोग आहेत. कधी वीरश्री अंगात संचारते आणि ‘डोळ्यांत रक्त उतरतं’. कधी वात किंवा तेल घालून डोळे एखाद्याची उत्पंठतेने वाट पाहतात. कधी तिरस्कार व्यक्त करताना हेच डोळे ‘डाव्या डोळ्याने कुणाकडे पाहतही नाहीत’, तर कधी ‘वाकडय़ा डोळ्याने पाहतात’. जवळच्या माणसावर आपण ‘डोळे झाकून विश्वास ठेवतो’. घाबरून ‘डोळ्यांपुढं काजवे चमकतात’. एखाद्याचा मत्सर वाटू लागला की, तो ‘डोळ्यांत खुपू लागतो’. कुणाची कामगिरी पाहून ती ‘डोळ्यांत भरते’.

प्रेमकटाक्षांनी प्रहार करणं, नेत्रसंकेत करणं म्हणजे ‘डोळ्यांनी मारणं’. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्याकडं पाहून, हळूच हसून एकच डोळा मिचकावणं म्हणजे ‘डोळा मारणं’, पण हीच कृती समोरील व्यक्तीचा प्रतिसाद लक्षात न घेता केली तर वाकड्या नजरेची द्योतक मानली जाते हे विसरता कामा नये.