
श्रेयस अय्यरने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून एकही सामना जिंकलेला नाही. टी-20 विश्वचषक जिंकून विजयाच्या आनंदात असलेला संघ अचानक एकापाठोपाठ एक पराभवांना सामोरा जात आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पराभवांची मालिका ठरली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर सर्वाधिक प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. पण त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर त्याच्यासाठी पुढे सरसावली आहे. श्रेष्ठा यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा दाखला देत आपल्या भावाच्या बचावासाठी पुढे आली आहे.
श्रेयसच्या भविष्याबद्दल म्हणाली…
श्रेष्ठा श्रेयसच्या नेतृत्वाबाबत म्हणाली की, ‘माझा भाऊ भविष्यात सर्वोत्पृष्ट कर्णधारांपैकी एक असेल. फक्त वाट पाहा. भारताने आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्पृष्ट कर्णधारांपैकी तो एक असेल. तो कर्णधार म्हणून हरतोय, असे म्हणणे आपल्यासाठी सोपे आहे, पण आपल्याला संपूर्ण कहाणी माहीत नसते. लोक कर्णधाराला केवळ निकालांवरूनच पारखतात.’
धोनी, रोहित, सचिन आणि विराट यांचेही उदाहरण
श्रेष्ठाने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा दाखला दिला आहे. श्रेष्ठा म्हणाली की, ‘प्रत्येक भारतीय कर्णधाराने आपापल्या परीने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस. धोनी आणि सचिन तेंडुलकर हे सर्व अनेक सामने हरले आहेत. पण जर तुम्ही फक्त श्रेयसलाच लक्ष्य करत राहिलात तर समस्या दुसरीकडे असू शकते. ती वेळ लवकरच येत आहे. मला खात्री आहे की, तो भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक बनेल.’

























































