FIFA World Cup 2026 – युरोपातील दोन महासत्ता भिडणार; बेल्जियमसमोर स्पेनचे कडवे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी पहाटे युरोपातील दोन बलाढय़ संघ स्पेन आणि बेल्जियम आमने सामने येणार आहेत. गत युरोपियन विजेता स्पेनचा अलीकडील दमदार फॉर्म आणि बेल्जियमविरुद्धची वर्चस्वाची परंपरा पाहता ‘ला रोजा’चे पारडे जड मानले जात आहे. स्पेनने स्पर्धेची सुरुवात काबो व्हर्डेविरुद्ध गोलशून्य बरोबरीने केली होती. मात्र त्यानंतर लुईस दे ला फुएंते यांच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले. उपउपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालविरुद्धचा सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच बदली खेळाडू मिकेल मेरिनोने दुखापत वेळेत निर्णायक गोल झळकावत स्पेनला पुढील फेरीत पोहोचवले. आता दुसरे विश्वविजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणाऱ्या स्पेनकडे दर्जेदार आणि संतुलित संघरचना आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिस्पर्ध्यासाठी हा संघ मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे बेल्जियमची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर त्यांनी सावरत बाद फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीत सेनेगलविरुद्ध दोन गोलांनी पिछाडीवरून पुनरागमन करत विजय मिळवल्याने संघाचा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर सहयजमान अमेरिका संघाला 4-1 अशा फरकाने पराभूत करून ‘रेड डेव्हिल्स’ने आपली ताकद दाखवून दिली

स्पेनचा भक्कम बचावबेल्जियमचे धोकादायक आक्रमण

या विश्वचषकात स्पेनने अद्याप एकही गोल स्वीकारलेला नाही. सलग पाच सामने ‘क्लीन शीट’ राखणाऱ्या स्पॅनिश बचावफळीने पोर्तुगालसारख्या आक्रमक संघालाही रोखले. मात्र बेल्जियमची आक्रमण फळी या मालिकेला खंडित करू शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. बेल्जियमने मागील पाच सामन्यांत तब्बल 13 गोल झळकावले असून, सरासरी 2.6 गोल प्रति सामना अशी कामगिरी केली आहे. चार्ल्स डी केटेलारे, जेरेमी डोपू आणि लिअँड्रो ट्रॉसार्ड यांच्या नेतृत्वाखालील आक्रमणफळी स्पेनच्या बचावाची खरी परीक्षा घेणार आहे.

स्पेनचे ऐतिहासिक वर्चस्व

स्पेनचा फॉर्मच नव्हे, तर इतिहासही त्यांच्याच बाजूने आहे. बेल्जियमविरुद्धच्या अखेरच्या पाचही लढती स्पेनने जिंकल्या असून मागील आठ सामन्यांत त्यांना एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. स्पेनने सलग चार विजयांसह नियोजित वेळेत तब्बल 35 सामने अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. स्पेनला शेवटचा पराभव 2024 मध्ये कोलंबियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात झाला होता. बेल्जियमही सलग 18 सामने अपराजित असला तरी त्यातील तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे निर्णायक क्षणी स्पेनचाच अनुभव आणि सातत्य निर्णायक ठरू शकते.

डी केटेलारेवर असणार नजर

बेल्जियमचा युवा आक्रमक चार्ल्स डी केटेलारे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन गोल करत ‘सामनावीरा’चा किताब पटकावला. त्याआधी तीन सामने गोलशून्य राहिल्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले आहे. प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांचा त्याच्यावरील विश्वास पुन्हा दृढ झाला असून त्यामुळे अनुभवी रोमेलू लुकापूला पुन्हा राखीव बाकावर बसावे लागू शकते. स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर डी केटेलारे मोठा धोका ठरू शकतो.

संभाव्य संघ

स्पेन उनाई सिमोन, पेद्रो पोरो, पाउ पुबार्सी, आयमेरिक लापोर्ते, मार्प पुपुरेला, रोड्री, पेद्री, लामिन यामाल, दानी ओल्मो, अॅलेक्स बाएना, मिकेल ओयार्झाबाल.

बेल्जियम थिबो कोर्टुआ, टिमोथी कास्टान्ये, एनगोय, ब्रँडन मेखेले, मॅक्सिम डी क्युपर, अमाडू ओनाना, निकोलस रास्किन, जेरेमी डोपू, युरी टिलेमान्स, लिअँड्रो ट्रॉसार्ड, चार्ल्स डी केटेलारे.