नागपूरच्या मतदारांची नावे नालासोपाऱ्यात, कोणताही अर्ज न करता नावे हलवली; ‘एसआयआर’ प्रक्रिया मोहिमेत मोठय़ा त्रुटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआर मोहीम सुरू आहे, परंतु एसआयआर मोहिमेत अनेक त्रुटी समोर येत आहेत. निष्काळजीपणाचा कळस म्हणजे नागपूरमधील काही मतदारांची नावे थेट पालघर जिह्याच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, तर काही मतदारांचे मतदान केंद्र आणि मतदारसंघ कोणतीही पूर्वसूचना न देता बदलण्यात आले आहेत.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कल्याणनगर येथील रहिवासी सैफुद्दीन खान यांचे नाव पालघर जिह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दिसून आले आहे. सैफुद्दीन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅपिंग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीपासून ही त्रुटी आहे. आपण अनेक वेळा निवडणूक कार्यालयात तक्रार केली, परंतु आपल्याला अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अजनी येथील सेंट्रल रेल्वे का@लनी येथील रहिवासी खालीक शेख यांचे मतदान केंद्र कोणताही अर्ज न करता घरापासून दूर असलेल्या सोनेगाव येथे हलविण्यात आले आहे. अजनीत राहायला असूनही त्यांचे मतदान केंद्र इतक्या दूर का बदलण्यात आले? याचे कोणतेही स्पष्टीकरण मिळत नाही. तसेच त्यांच्या आई झरीन शेख यांचे नाव थेट पालघर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

गोंधळात गोंधळ

एसआयआर प्रक्रियेत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जात आहे. मतदान केंद्र, मतदारसंघ किंवा जिल्हा बदलण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नसताना निवडणूक आयोगाने परस्पर बदल केले आहेत. मतदार यादीतून नाव वगळण्याची भीती अनेकांना वाटत आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार कोण? असा सवाल मतदारांकडून विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी केल्यानंतरच यावर बोलणे उचित ठरेल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी म्हटले आहे.