
>>मंगेश वरवडेकर<<
तिरंगा खांद्यावर आहे… पण उत्तर अजूनही खिशात नाही. आठ वर्षांपूर्वी रशियाच्या वर्ल्ड कपच्या गर्दीत मी चक्क तिरंगा खांद्यावर टापून फिरत होतो. समोर अर्जेंटिनाचे चाहते गात होते. फ्रान्सचे ढोल दणाणत होते. क्रोएशियन चाहते फोटो काढत होते. तेवढय़ात एका परदेशी चाहत्याने तिरंग्याकडे पाहिलं. माझ्याशी हात मिळवला आणि सहज विचारलं, तुमच्या देशाचे चाहते एवढे दिसतात… पण तुमचा संघ पुठे आहे? मी हसलो. कारण काही प्रश्नांची उत्तरं तोंडात नसतात. ती पोटात गोळा आणतात. तो पुन्हा म्हणाला, ‘तुमचा नंबर कधी येणार?’
आठ वर्षांपूर्वी तो प्रश्न कानावर पडला होता. आज अमेरिकेतही कायम आहे. अर्जेंटिनाच्या विजयानंतर अटलांटावरून विपुल पटेल या फुटबॉलवेडय़ाने मला पह्न केला आणि तोसुद्धा हेच म्हणाला. इथे हजारो हिंदुस्थानी भेटले, पण प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न कायम होता.
वर्ल्ड कप बदलला. संघांची संख्या वाढली. फुटबॉलचा नकाशा रुंदावला. नवी राष्ट्रं आली. अशी चिमुकली बेटं आली की, आपल्या मुंबईच्या नकाशावर एखाद्या पालिकेच्या वॉर्डाएवढी वाटतील. पुरासाव वर्ल्ड कपच्या निमित्ताने अमेरिका गाठतो. अवघ्या पाच लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेला काबो व्हर्दे फक्त येत नाही, जगाला स्वतःची दखल घ्यायला लावतो. जॉर्डन येतो. उझबेकिस्तान येतो. पण 148 कोटींचा हिंदुस्थान? अजूनही वेशीबाहेरच आहे. आपल्या फुटबॉलची शोकांतिका हीच आहे. आपण वर्ल्ड कप खेळत नाही. आपण वर्ल्ड कपची ‘शक्यता’ खेळतो.
आज अमेरिकेत हजारो हिंदुस्थानी आलेत. पुणाच्या अंगावर मेस्सीची जर्सी, पुणाच्या रोनाल्डोची. पुणी एम्बाप्पे, पुणी यमाल. पुणी अर्जेंटिना, पुणी ब्राझील, पुणी पोर्तुगाल. आमच्या हातात तिरंगा आहे, पण छातीवर आपल्या संघाचं नाव नाही आणि प्रत्येकाच्या मनात तोच प्रश्न ‘हमारा नंबर कब आएगा?’
हे दृश्य विलक्षण वेदनादायी आहे. आपल्याकडे प्रेम आहे, पण आपला प्रियकर नाही! जल्लोष आहे, पण आपला विजय नाही! तिरंगा आहे, पण मैदानावर तो घेऊन धावणारा संघ नाही.
हजारो हिंदुस्थानी हजारो डॉलर खर्च करून अमेरिका गाठू शकतात. मेस्सीच्या एका तिकिटासाठी महिन्याचा पगार मोजू शकतात. मध्यरात्री तीन वाजता अलार्म लावून सामना पाहू शकतात, पण 148 कोटी लोक मिळून अकरा असे फुटबॉलपटू घडवू शकत नाहीत, जे वर्ल्ड कपच्या मैदानावर राष्ट्रगीतासाठी मान ताठ करून, छाती फुगवून उभे राहतील? हा प्रश्न आता टोचत नाही. लाजवतो. अक्षरशः लाज वाटते.
आपल्या नंबरबाबत संघटना असो किंवा सरकार पुणालाही विचारले तर त्यांनी पृपा करून पुन्हा तीच जुनी कॅसेट लावू नये. मैदानं नाहीत. प्रशिक्षक नाहीत. पैसा नाही. संस्पृती नाही. सुविधा नाहीत. अहो, किती वर्षं? आपल्याकडे संघटना आहेत, अकादमी आहेत, लीग आहेत, क्लब आहेत, प्रायोजक आहेत, विदेशी प्रशिक्षक आहेत, डेटा अॅनालिस्ट आहेत, फिटनेस कोच आहेत, फिजिओ आहेत, सोशल मीडिया टीम आहेत, जर्सी लाँच आहे, प्रोमो आहे, ड्रोन शूट आहे. फक्त एक गोष्ट अधूनमधून हरवते, ती म्हणजे फुटबॉल!
आपल्या फुटबॉलच्या फुग्यात सर्व प्रकारची हवा आहे. ब्रँडिंगची हवा. भाषणांची हवा. पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनांची हवा. ‘व्हिजन’ची हवा. ‘रोडमॅप’ची हवा. पण मैदानावर गेल्यावर लक्षात येतं की चेंडूतच हवा नाही.
प्रत्येक पराभवानंतर ‘चिंतन’ होतं. समिती बसते. अहवाल तयार होतो. नवा प्रशिक्षक येतो. जुना जातो. मग 2030, 2034, 2040 अशी वर्षं फळय़ावर लिहिली जातात. आपल्या फुटबॉलचं वैशिष्टय़ असं की आपण गोल कमी करतो, पण गोलपोस्ट सतत पुढे ढकलतो. वर्ल्ड कप गाठला नाही, पण पॅलेंडर नक्की गाठलं, पण दोष फक्त व्यवस्थेचा नाही. आपल्या
फुटबॉलपटूंनीही आरशात पाहायला हवं. दोन चांगले सामने झाले की आपल्याकडे ‘स्टार’ जन्माला येतो. चार रील्स. पाच जाहिराती. सहा मुलाखती. सात टॅटू. आठ ब्रॅण्ड आणि नवव्या सामन्यात ? पहिला टच तीन फूट दूर.
जगाच्या नकाशावर मायक्रोस्कोप घेऊन शोधावा लागेल अशा पुरासाव देशाचा मुलगा वेगळय़ा ग्रहावर जन्मलेला नाही. काबो व्हर्देच्या मुलांच्या पायात जन्मतः सोन्याचे बूट नसतात. फरक एवढाच आहे की ते मुलांना मैदान देतात, आपण मैदानावर मंगल कार्यालय उभी करतो. ते प्रशिक्षक घडवतात, आपण पदाधिकारी वाढवतो. ते योजना राबवतात, आपण योजना जाहीर करतो. ते हरल्यानंतर कारण शोधतात, आपण कारण आधीच तयार ठेवतो.
एवढय़ावरच सारं थांबत नाही. प्रश्न आपल्या घरांनाही आहे. पालकांनाही आहे. मुलगा म्हणाला, मला फुटबॉलपटू व्हायचंय, तर पहिला प्रश्न असतो, पण नोकरी? तो म्हणाला, मला मेस्सी व्हायचंय. आपण म्हणतो, आधी इंजिनीअर हो. मग रविवारी मेसी हो!
आपल्याला मेस्सी हवा आहे, पण सहा वर्षांच्या मुलाला मातीत लोळू द्यायचं नाही. एम्बाप्पे हवा आहे, पण मुलगा उन्हात खेळला की आई ओरडते, काळा होशील, घरी ये. फुटबॉलपटू एसीच्या खोलीत तयार होत नाही. तो धुळीत, पावसात, घामात आणि पराभवाच्या राखेत तयार होतो. ही भट्टी आहे. सोन्याला जशी भट्टीत जळल्यानंतर लकाकी येते, तशाच भट्टी खेळाडूंनाही जळावं लागतं.
आता 148 कोटींच्या देशाने फुटबॉलच्या आरशात स्वतःचा चेहरा पाहायला हवा. आपल्याला वर्ल्ड कपमध्ये जाण्याचा जन्मसिद्ध हक्क नाही. तो घामाने, शिस्तीने, विज्ञानाने, नियोजनाने, प्रामाणिक निवडीने, गावागावातून प्रतिभा शोधून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहाण्यांची राष्ट्रीय टीम बरखास्त करून तो कमवावा लागेल.
पुरासाव जाऊ शकतो, कोबा व्हर्दे जाऊ शकतो, जॉर्डन जाऊ शकतो, उझबेकिस्तान जाऊ शकतो, तर हिंदुस्थान का नाही? फिफा वर्ल्ड कपमध्ये तिरंगा फक्त प्रेक्षकांच्या हातात नको. तो खेळाडूंच्या खांद्यावर हवा!
कधीतरी जगाने आपल्या गोलावर ओरडायला हवं. कधीतरी वर्ल्ड कपच्या स्टेडियममध्ये आपलं राष्ट्रगीत सुरू झालं पाहिजे आणि 148 कोटी लोकांच्या अंगावर एकाच वेळी काटा आला पाहिजे. कधीतरी तिरंगा स्टॅण्डमध्ये नव्हे, सेंटर सर्पलजवळ दिसला पाहिजे.
वर्ल्ड कप पाठोपाठ वर्ल्ड कप जात आहेत, पण प्रश्न तोच आहे. फक्त आता संयम कमी झालाय. आणखी किती वर्ल्ड कप? आणखी किती समित्या? आणखी किती रोडमॅप? आणखी किती बहाणे? आणखी किती पिढय़ा दुसऱ्यांच्या जर्सी घालणार? आजही 148 कोटी हिंदुस्थानींच्या मनातला सर्वात जळजळीत प्रश्न एकच आहे, हमारा नंबर कब आएगा? या प्रश्नाची एक्सपायरी डेट जवळ आलीय. उत्तर शोधावेच लागेल.



























































