
राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात गेल्या चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे शेकडो अधिकारी व कर्मचारी आजारी पडले आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच कर्मचारी जुलाब, उलट्या व तापामुळे बेजार झाले असून उपचारासाठी मंत्रालयातल्या दवाखान्यात रांगा लागल्या आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. दरम्यान, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
मंत्रालयातील कर्मचारी सोमवारपासून अचानक आजारी पडू लागले. कुणाला उलटय़ा तर कुणाला जुलाब होत असून काहींना तापही आला. दूषित पाण्यामुळे एकाच वेळी इतके लोक आजारी पडल्याची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आहे. प्रामुख्याने मंत्रालायाच्या मुख्य इमारतीमधील कर्मचाऱयांना दूषित पाण्याचा त्रास झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात जावे लागले, असेही सांगण्यात येते.
- सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर याबाबत स्पष्टीकरणदेताना म्हणाले की, ‘दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार आल्यानंतर विभागाने तातडीने उपाययोजना करून ही अडचण दूर केली. पावसाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.’
सार्वजनिक बांधकाम खात्याचा हलगर्जीपणा
मंत्रालयातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी विभागाने योग्य काळजी न घेतल्याचे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. दूषित पाण्याबद्दल कर्मचाऱयांनी थेट मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली आहे. पण सर्व मंत्रिमंडळ व सचिव सध्या पावसाळी अधिवेशनात व्यग्र असल्याने कर्मचाऱयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही, अशी तक्रार काहींनी केली. मागील चार दिवसांपासून आम्ही बाटलीबंद पाणी विकत आणत आहोत, असेही या कर्मचाऱयांनी सांगितले.
तळमजल्यावरील टाकीत गटाराचे पाणी?
मंत्रालयातील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेसमोर जमिनीखाली पाण्याची साठवण टाकी आहे. या टाकीतील पाणी वरच्या टाकीत जाऊन त्याचा पुरवठा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला होतो. गटाराचे दूषित पाणी पिण्याच्या मुख्य टाकीत शिरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले
जुलाब आणि पोटदुखीची तक्रार घेऊन येणाऱया कर्मचाऱयांची संख्या वाढल्यामुळे मंत्रालयाच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाण्याचे नमुने तापसण्याबाबत पत्र दिले होते. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठिविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.




























































