हे सरन्यायाधीशांना द्या, सर्वोच्च न्यायालयात वकिलाने कागदपत्रं उधळली; नेमकं काय घडलं? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयात एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार घडला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश विरोधात अपशब्दांचा वापर केला आणि न्यायाधीशांसमोरच कागदपत्रे उधळली. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करत त्याला कोर्टरूमच्या बाहेर काढले. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?

न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर ही घटना घडली. हा याचिकाकर्ता वकील स्वतःच्या प्रकरणाची बाजू स्वतःच मांडत होता. सुनावणी सुरू होताच त्याने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट खंडपीठालाच आदेश देण्यास सुरुवात केली. सुनावणीदरम्यान या वकिलाने न्यायाधीशांना उद्देशून म्हटले की, “मिस्टर ज्युडिशियल सर्व्हंट (न्यायिक सेवक), मी तुम्हाला आदेश देतो की तुम्ही एसीपी लखनौ यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्या.”

वैकलचे हे वर्तन पाहून न्यायालयात उपस्थित सर्वजण अवाक झाले. यावर न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी त्याला विचारले, “तुम्ही मला आदेश देत आहात? तुम्ही आम्हाला आदेश देत आहात?” यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्या बाजूने एवढेच सांगायचे होते. सर्व काही रेकॉर्डवर आहे.”

एवढे बोलून या व्यक्तीने रागाच्या भरात केसची फाईल हवेत उधळली आणि भर न्यायालयात सरन्यायाधीश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला कोर्टरूममधून बाहेर काढले.

न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, या प्रकरणात न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय येऊनही आणि न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद भाषेचा कथित वापर होऊनही, खंडपीठाने या वकिलाविरुद्ध अवमान किंवा इतर कोणतीही दंडात्मक कारवाई सुरू न करण्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, न्यायालय त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा विचार करत नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून त्यांची विशेष रजा याचिका (SLP) देखील फेटाळून लावली.