आधी एक आदर्श आई व्हा मग IAS अधिकारी बना, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा तरुणींना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महिलांनी आयएएस (IAS) अधिकारी किंवा शिक्षिका बनण्याआधी एक ‘आदर्श माता’ बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या किंमतीवर व्यावसायिक यश मिळवता कामा नये, असे देखील त्या म्हणाल्या.

कानपूर विद्यापीठाच्या 41 व्या दीक्षांत समारंभात बोलताना ८४ वर्षीय आनंदीबेन पटेल यांनी तरुण महिलांना आवाहन केले की, त्यांनी लग्नानंतरही आपले शिक्षण आणि करिअर सुरू ठेवावेच सोबत कुटुंब आणि समाजासाठी देखील आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

राज्य विद्यापीठांच्या कुलपती असलेल्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांना संबोधित करताना कौटुंबिक मूल्ये, पालकांची जबाबदारी यावर भाष्य केलं. शिक्षण हे केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित नसावे, असे त्या म्हणाल्या.

“तुम्ही आयएएस अधिकारी व्हा किंवा शिक्षिका व्हा पण त्या आधी एक आदर्श माता व्हा. घरातील प्रत्येकाला जेवण बनवता आले पाहिजे”, असेही त्या म्हणाल्या.

“मुले शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश केल्यानंतर काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष असायला हवे. पालकांच्या अगदी छोट्याशा दुर्लक्षामुळेही मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.