ठाण्यात नालेसफाईचा मोठा झोल; 7 ठेकेदारांना नोटिसा, 28 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यात नालेसफाईत मोठा झोल झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ठेकेदारांविरोधात पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अॅक्शन घेतली असून नालेसफाईच्या कामात चुना लावणाऱ्या सातजणांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या सर्व कंत्राटदारांकडून २८ लाखांचा दंड वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे झोलझपाट कारभार करून मलई लाटणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत १० एप्रिलपासून नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली. मोठा गाजावाजा करत शिंदे गटाच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मुंब्रा परिसरातून या मोहिमेची सुरुवात केली. शहरात कुठेही पावसाचे पाणी तुंबू नये आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश दिले होते. शहरातील सुमारे १८६ लांबीच्या नाल्यांच्या सफाईसाठी सात वेगवेगळ्या ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान नाले सुरळीत प्रवाहित ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई न झाल्याने मुसळधार पावसात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ साचला आणि त्याचा फटका ठाणेकरांना बसला.

दिव्याच्या ठेकेदाराला सर्वात जास्त दंड

शिळफाटा परिसर अक्षरशः पाण्याखाली गेल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दिव्यात नालेसफाईनंतर गाळ त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. सर्वाधिक फटका दिव्याला बसल्याने या परिसरात नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराला सर्वात जास्त म्हणजेच ७ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.