
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, पोलीस यंत्रणेतील रिक्त पदे, दोषसिद्धीचा घटता दर आणि विविध विकास प्रकल्पांमधील पारदर्शकतेच्या अभावावर सरकारला धारेवर धरले.
सतेज पाटील यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या आकडेवारीचा दाखला देत महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली. महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांचे वाढते जाळे, बेपत्ता महिला, अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचार तसेच वाढते सांप्रदायिक गुन्हे याबाबत सरकारच्या अपयशावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पोलीस दलातील हजारो रिक्त पदे, अपुरी फॉरेन्सिक यंत्रणा आणि गंभीर गुन्ह्यांमधील घटता दोषसिद्धी दर यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्याची टीकाही त्यांनी केली.



























































