
गेल्या काही दिवसांपासून आभाळ फाटल्यागत कोसळत असलेल्या पावसामुळे मुरबाड तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. खोपिवली गावात शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उभारलेला लोखंडी पूल पुरामध्ये वाहून गेला असून बळीराजाच्या ९० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. शेतापर्यंत पोहोचायचे कसे याची चिंता त्यांना सतावत असून भातपिकांची पेरणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे ठाकले आहे. दरम्यान लवकरात लवकर नवा पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुरबाड तालुक्याच्या खोपिवली गावातील ९० शेतकऱ्यांनी वर्गणी काढून २०१८ साली २५ मीटर लांबीचा लोखंडी पूल भामखोर नदीवर उभारला. याच पुलावरून दरवर्षी शेतकरी आपल्या शेताकडे जातात. ९० घरांची मिळून किमान २५० हेक्टर भातशेती भीमाशंकर सह्याद्री अभयारण्यालगत आहे. रहिवाशांकडे शेतीशिवाय उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. पावसाळ्यात भातपिकांच्या लागवडीसह शेतीची अन्य कामे ९० कुटुंबे एकत्रितपणे करतात.
मुसळधार पावसामुळे मुरबाडमधील अनेक नद्यांना सध्या पूर आला आहे. शेतावर जाण्यासाठी भामखोर नदी ओलांडूनच जावे लागते. ही नदी डोंगरातून येत असून प्रचंड वेगाने पाणी वाहते.
पावसाचा मारा एवढा जबरदस्त होता की, पाण्याच्या लोंढ्यामुळे मंगळवारी भामखोर नदीवर उभारलेला लोखंडी पूल वाहून गेला. त्यामुळे शेताकडे जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.
शेतामध्ये लागवड करता आली नाही तर ९० कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडणार असून भविष्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे या नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा, अशी मागणी चिंतामण हुमणे, जीवन कराळे, बाळकृष्ण भांडे, कचरू हुमणे व हेमंत हरड या शेतकऱ्यांनी केली आहे.
नव्या पुलाचा प्रस्ताव
मुरबाड तालुक्यातील कोसळलेल्या पुलाची तहसीलदार अभिजित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष व संबंधित विभागाला त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. नवा पूल उभारण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला लवकरच प्रस्ताव देणार असून तो मंजूर करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.




























































