नांदेड हादरले! जन्मदात्या वडिलांची मुलाकडून गळा चिरून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या 65 वर्षीय वडिलांची त्यांच्या मुलानेच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी पहाटे नांदेडमधील अर्धापूर शहरातील महावितरण कार्यालयासमोर एका वृद्ध व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच अर्धापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस उपअधीक्षक माणिक बेदरे आणि पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूत्रे हाती घेतली.

तपासादरम्यान मृताची ओळख सखाराम नामदेव पातळे (वय 65) अशी पटली. पुढील तपासात त्यांच्याच मुलाने, गुणाजी पातळे याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

सखाराम पातळे हे अर्धापूर न्यायालयाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. शहरात भंगार गोळा करून ते विकून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून किंवा अन्य कारणावरून आरोपी मुलाने रागाच्या भरात वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर सखाराम पातळे यांचे अन्य दोन मुलगे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास सुरू आहे.

गरिबीत जीवन जगणाऱ्या कुटुंबात घडलेल्या या हत्येने अर्धापूरसह नांदेड जिल्हा हादरला असून, या घटनेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.