आलवडी गावचे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार! सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा तालुक्यातील परळी खोऱयातील आलवडी गावावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. गावातील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी जीविताचा धोका टाळण्यासाठी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुसळधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री आलवडी गावातील मंदिरालगतच्या डोंगराचा मोठा भाग कोसळून भूस्खलन झाले. माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा भातशेतीवर कोसळल्याने शेतकऱयांचे नुकसान झाले. ही घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गावाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सीईओ याशनी नागराजन, प्रांताधिकारी आशीष बारकुल, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘परिसरात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने डोंगरात मोठय़ा प्रमाणात पाणी मुरले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून, काही घरांनाही तडे गेले आहेत. या परिस्थितीत ग्रामस्थांनी कोणताही धोका न पत्करता, पाटेघर येथे उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात तातडीने स्थलांतर करावे. आलवडी गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.’

सातारा-सज्जनगड मार्गावर दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे सातारा-सज्जनगड मार्गावर दरड कोसळून काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अतिवृष्टीमुळे डोंगरउतारावरील माती मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर आली, तर अनेक झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग काही तासांसाठी बंद झाला होता. प्रशासनाने तातडीने यंत्रणा पाठवून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील मातीचे ढिगारे आणि पडलेली झाडे हटवण्याचे काम केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.