
सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल दुकानावर ‘एफडीए’ने कारवाई करत सील ठोकले. हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानातूनच औषधे घेण्यासाठी सक्ती करण्यात असल्याची व्यथा ‘सैराट’फेम अभिनेता सल्या ऊर्फ अरबाज शेख याने व्हिडीओतून मांडली होती. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत ‘एफडीए’ने कारवाई करत मेडिकलला सील ठोकले.
सैराट चित्रपटात सल्याची भूमिका साकारलेल्या अरबाज शेख यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज व हृदयविकाराच्या उपचारासाठी सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अरबाज शेख याला रुग्णालयातून रुग्णासाठी गोळ्या व औषधे लिहून देण्यात आली होती. सदरची औषधे व गोळ्या रुग्णालयात असलेल्या फातिमा मेडिकलमधूनच घेण्याची सक्ती करण्यात आली होती. सदरच्या औषधांची एकूण किंमत 40 हजारपेक्षा अधिक झाली होती. मात्र, तीच औषधे व गोळ्या बाहेरच्या मेडिकल दुकानात 20 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळत असल्याचे अरबाज शेख याने व्हायरल केलेल्या व्हिडीओतून सांगितले होते. मात्र, रुग्णालयाकडून होणाऱया सक्तीमुळे तो धायकुतीला आला होता. त्यामुळे त्याने आपली व्यथा व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर मांडली. याची गंभीर दखल घेत ‘एफडीए’ने तातडीने रुग्णालयातील मेडिकलवर कारवाई करत सील ठोकले. यावेळी मेडिकल दुकानात अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सोलापुरात पहिल्यांदाच रुग्णालयात थाटलेल्या मेडिकल दुकानावर झालेल्या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.




























































