शास्त्रीनगर रुग्णालयाला पोलिसांचे कडे, सुरक्षेच्या हमीनंतर डॉक्टर्स, कर्मचारी कामावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला तसेच पुरुष डॉक्टर आणि परिचारकांना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अखेर डॉक्टर संघटनांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. मात्र सुरक्षेच्या हमीशिवाय पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे आजपासून पालिका रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांना पोलिसांचे कडे होते. तगड्या पोलीस बंदोबस्तानंतरच डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा सुरू केली.

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर आणि कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने अनेक नागरिक या महापालिका रुग्णाल यांवर अवलंबून आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या गुंड साथीदारांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व नर्सना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांत रुग्णांचे मोठे हाल झाले. अनेकांना उपचारासाठी कल्याण किंवा कळवा येथील रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागली.

या घटनेनंतर बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देत पोलीस प्रशासनाकडे आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने काम बंद आंदोलन मागे घेतले. असे असले तरी पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय कामावर हजर होण्यास तयार नव्हते.

अखेर ओपीडी सुरू

शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर विष्णूनगर पोलीस सात ते आठ कायमस्वरूपी तैनात राहणार आहेत. तसेच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पासप्रणाली आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली कौन्सलिंग केंद्र सुरू केले जाणार आहे. आयुक्तांनी दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनानंतर डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेत गुरुवारपासून रुग्णसेवा पुन्हा सुरू केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली ओपीडी सुरू झाल्याने हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

टक्केवारी मिळाली की हात उचलत नाही

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स पोस्टवर डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे. यावेळी त्यांनी निकृष्ट विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांवर, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कधी हात उचला जात नाही. कारण टक्केवारी मिळते, असे म्हणत दबंगगिरी करणाऱ्या नगरसेवकांचे कान टोचले आहेत.

आयुक्तांच्या बैठकीनंतर सूत्रे हलली

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सादिया पिंजारी, एएमआयचे पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह १५ ते २० डॉक्टर उपस्थित होते. बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षेची पूर्ण हमी दिली.