
तब्बल 158 वर्षांनंतर हिंदुस्थानात एक दुर्मीळ जांभळ्या-निळ्या रंगाचे अल्पाइन फूल पुन्हा आढळून आले आहे. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) च्या शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील चुना व्हॅली येथे या दुर्मीळ वनस्पतीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, हिंदुस्थानात या वनस्पतीची शेवटची नोंद 1867 मध्ये सिक्कीममध्ये प्रसिद्ध ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ सर जोसेफ डाल्टन हूकर यांनी केली होती.
बीएसआयने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुधांशु शेखर दास, डॉ. सुभजित लाहिरी आणि मोनालिसा दास या शास्त्रज्ञांच्या पथकाने Cyananthus hookeri या दुर्मीळ अल्पाइन वनस्पतीचा तब्बल 158 वर्षांनंतर पुन्हा शोध लावला आहे. याचबरोबर अरुणाचल प्रदेशातील या प्रजातीची ही पहिली अधिकृत नोंद ठरली आहे.
बीएसआयने म्हटले आहे की, हा शोध पूर्व हिमालयातील समृद्ध जैवविविधतेचा महत्त्वाचा पुरावा असून, हिंदुस्थानातील नाजूक अल्पाइन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सातत्याने संशोधन आणि शोधमोहीम राबवण्याची गरज अधोरेखित करतो.
या संशोधनाचे निष्कर्ष गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय संवर्धनविषयक ‘Oryx’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. संशोधकांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की, Cyananthus hookeri या वनस्पतीचे शास्त्रीय वर्णन प्रथम 1912 मध्ये पूर्व नेपाळातील वलानचून (Wallanchoon) येथील नमुन्याच्या आधारे करण्यात आले होते. ही वनस्पती भूतान, चीन, भारत आणि तिबेट या पूर्व हिमालयीन भागात आढळत असली तरी तिचा प्रसार अत्यंत मर्यादित आहे.
संशोधकांनी हिंदुस्थानासह विविध देशांतील हर्बेरियम संग्रहांचा अभ्यास केला असता, हिंदुस्थानातील केवळ दोन नमुने उपलब्ध असल्याचे आढळले. हे दोन्ही नमुने 1867 मध्ये सिक्कीममध्ये समुद्रसपाटीपासून 3,657 मीटर उंचीवर सर जोसेफ डाल्टन हूकर यांनी गोळा केले होते. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील हा शोध हिंदुस्थानातील गेल्या 158 वर्षांतील पहिली नोंद ठरला आहे.
कॅम्पान्युलेसी (Campanulaceae) कुलातील Cyananthus hookeri ही बुटकी, झुपक्यांमध्ये वाढणारी वनस्पती असून तिला आकर्षक जांभळ्या-निळ्या रंगाची फुले येतात. ही फुले चीन-हिमालयीन प्रदेशातील अतिशय संवेदनशील अल्पाइन कुरणांमध्ये वाढतात.
संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना जंगलात या वनस्पतीची 50 पेक्षाही कमी प्रौढ झाडे आढळली. त्यामुळे या प्रजातीची संख्या अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संशोधकांनी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN) च्या रेड लिस्ट निकषांनुसार हिंदुस्थानात Cyananthus hookeri या वनस्पतीला ‘संकटग्रस्त’ (Endangered) म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे.




























































