
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात डिजिटल बॅंकिंग व्यवहारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बॅंकेने वर्षभरात १ हजार १५ कोटीचे डिजीटल व्यवहार नोंदवले आहेत.त्यामध्ये युपीआयमध्ये ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
ग्रामीण आणि दुर्गम भागातही आता डिजीटल सेवेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागांत डिजीटल साक्षरता सारखे उपक्रम राबवून जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना डिजीटल बॅंकिंगच्या प्रवाहात आणले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांना आधुनिक आणि सुरक्षित डिजीटल सेवा देण्यासाठी डिजीटल बॅंकिंग प्रणालीचा सतत प्रचार आणि प्रसार केला आहे.जिल्हा बॅंक हि शेतकऱ्यांची बँक आहे.तिच्या शाखा ग्रामीण आणि दुर्गम भागात आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डिजीटल बॅंकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा बँकेने विशेष प्रयत्न केले आहेत.डिजीटल व्यवहारांचे प्रात्यक्षिक,ग्राहक मेळावे,डिजीटल साक्षरता उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल बॅंकिंगबाबत सुरक्षिततेचे मार्गदर्शन करण्यात आले.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने १९ एटीएम केंद्र आणि तीन फिरती एटीएम व्हॅन सेवा देत आहे.भविष्यात एईपीएस सेवेचा शुभारंभ करून डिजीटल सेवेत आणखी एक पाऊल टाकणार आहोत.





























































