Nanded News – लोह्यातील गोळीबार प्रकरणातील आरोपी पतीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात; पत्नीची प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्यावर गोळीबार करणार्‍या व तिला गंभीर जखमी करणार्‍या पतीला लोहा पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.

लोहा शहरातील उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या शिक्षक कॉलनीमध्ये दि.६ जुलै रोजी रात्री अकरा ते साडेअकरा वाजता पती विशाल जाधव पत्नी अर्चना जाधव यांच्यात त्यांच्याच घरात क्षुल्लक कारणावरून प्रारंभी शाब्दिक चकमक झाली. बाजूच्या खोलीमध्ये आरोपीचे आजोबा, आई, वडील हे जेवण करून झोपले असता आरोपी विशाल जाधव याने पत्नी अर्चना यांच्या चारित्र्यावरून संशय घेत थापडाबुक्यांनी मारहाण करून थोड्याच वेळात हातात बंदूक (गावठी कट्टा) घेऊन पत्नी अर्चना हिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यात पत्नी अर्चना या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गोळीबार करून आरोपी विशाल जाधव हा घटनास्थळावरून पसार झाला होता. मागील चार दिवसांपासून लोहा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपीच्या शोधार्थ लोहा पोलिसांचे तीन पथक मागावर होते. तर स्थागुशाकडून स्वतंत्र यंत्रणा तपासात होती. सदरील गोळीबारीच्या घटनेने लोहा शहर हादरले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा कडून आरोपी विशालचे सहकारी मंडळीना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. तपासाचे चक्रे गतिमान करत अवघ्या चार दिवसात पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थागुशा पथकास यश आले. आरोपी विशाल जाधवकडे बंदुक आली कुठून तो कोणत्या गुन्हेगाराच्या संपर्कात आहे. आदी बाबी पोलिसांकडून तपासण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. विशाल जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.