
नेस्को ड्रग पार्टी प्रकरणी आणखी एकाला वनराई पोलिसांनी अटक केली. नितेश ऊर्फ निक खेमलानी असे त्याचे नाव आहे. तो मुख्य सूत्रधार महेश ऊर्फ मार्क खेमलानीचा भाऊ आहे. त्याला न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निकच्या अटकेने अटक आरोपींची संख्या आता 14 झाली आहे.
एप्रिल महिन्यात नेस्को प्रदर्शन केंद्रात पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीमध्ये डान्स करताना एका तरुणीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला मालाड येथील एका रुग्णालयात दाखल केले. त्याच दरम्यान वनराई पोलिसांना एका खासगी रुग्णालयातून फोन आला. त्या पार्टीमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून सुरुवातीला सहा जणांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत मुख्य सूत्रधार महेश ऊर्फ मार्क खेमलानीचे नाव समोर आले होते. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी उल्हासनगर येथून एकाला अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेनंतर वनराई पोलिसांनी मार्कचा भाऊ नितेश ऊर्फ निकलादेखील अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणात आर्थिक व्यवहाराच्या तपासानंतर पोलिसांनी ही अटक केली आहे. निक आणि काही या पूर्वी अटक केलेल्या आरोपीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
12 आरोपींविरोधात 3547 पानांचे आरोपपत्र दाखल
ड्रग प्रकरणात पोलिसांनी 12 आरोपींविरोधात एकूण 3 हजार 547 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी 109 साक्षीदारांचे जबाब नोंद केले आहेत. आरोपीमध्ये मुख्य सूत्रधार आयुष, विकी, महेश खेमलानीचा समावेश आहे. या कार्यक्रमाला हजर असणाऱ्याचेदेखील पोलिसांनी जबाब नोंदवून घेतले आहेत. अद्यापही दोन जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपपत्र सादर केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली. त्यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.




























































