
सरकारच्या वतीने कोट्यवधी झाडे लावली जाणार आहेत. कुठेही, कुठलीही झाडे लावू नका. केवळ शोभेची झाडे लावू नका. स्थानिक हवामानाला पोषक आणि पक्ष्यांना आकर्षित करणारी फळझाडे लावा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आज विधानसभेत केली.
पुण्यातील अष्टविनायक महामार्ग रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी पर्यावरणीय अटीनुसार चार हजार झाडे लावणे बंधकारक होते. त्याचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे मांडला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेना आमदार अजय चौधरी आणि भास्कर जाधव यांनी सहभाग घेत ही मागणी केली.
कोकणात स्थानिक प्रजातींची झाडे लावा – भास्कर जाधव
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात आकेशिया, नीलगिरी, सुबाभुळ अशी वाऱ्याने कोसळणारी झाडे न लावता स्थानिक प्रजातींची जगणारी झाडे लावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 2009 मध्ये ‘फयान’ वादळ कोकणात झाले त्यावेळी सुमारे पाच हजार झाडे विजेच्या खांबांवर कोसळली होती. कोसळलेली झाडे सर्व शोभेची होती, स्थानिक प्रजातींची कोणतीही झाडे कोसळली नव्हती, असे त्यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात येणाऱ्या झाडांना ट्री-गार्ड लावावेत, अशी सूचना यावेळी आमदार शेखर निकम यांनी मांडली.
मुंबईत चिमण्या, पोपट पुन्हा दिसूदेत – अजय चौधरी
मुंबईत फळझाडे लावली जात नाहीत म्हणून चिमण्या, पोपट दिसेनासे झाले आहेत. महिंद्रा हरियाली संस्थेच्या माध्यमातून आपण महाबळेश्वर तालुक्यात 65 हजार झाडे लावली होती. त्यातील 72 टक्के झाडे जगली होती. सरकार हजारो झाडे लावतेय, पण केवळ सोपस्कार म्हणून कोणतीही झाडे न लावता फळझाडे लावा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील झाडे लावा – विधानसभा अध्यक्ष
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यावेळी वृक्षारोपण करताना महाराष्ट्रातील प्रजातींची झाडे लावण्यात यावीत. सध्या राजमुंद्री या हैदराबादमधील नर्सरीतून आणलेली झाडे महाराष्ट्रात जगत नाहीत, अशी सूचना केली.
महाराष्ट्रातील प्रजातींचीच झाडे लावू – शिवेंद्रराजे
अष्टविनायक महामार्ग रस्त्याच्या दुतर्फा दोन हजार झाडे लावण्यात आली आहेत. आता झाडे लावताना स्थानिक प्रजातींची झाडे लावली जातील, देखभाल करण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांना देण्यात येईल, असे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
























































