महाराष्ट्रात तब्बल 13 हजार तीव्र कुपोषित बालके, सर्वाधिक कुपोषण जळगावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विकास तळागाळापर्यंत पोहोचल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात असताना महाराष्ट्रात 2026 मध्ये तब्बल 13 हजार 321 तीव्र कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्य़ात सर्वाधिक 3 हजार 814 कुपोषित बालके आहेत. विधान परिषदेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे बालकांच्या प्रकृतीचा प्रश्न अजूनही गंभीर असल्याचे वास्तव समोर आले आहे.

विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड, सुनील शिंदे, एकनाथ खडसे यांनी रायगड आणि जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या स्थिती संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. रायगड जिल्ह्यात मार्च 2026 मध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत 94 हजार 613 बालकांपैकी 371 बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. यात 41 बालके तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले. तर जळगावमध्ये झालेल्या तपासणीत कमी वजनाची 19 हजार 529 बालके आढळली असून तब्बल 3 हजार 814 बालके तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कुपोषित बालकांची सर्वेक्षणातील आकडेवारीच मांडली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा बालकांचे वजन व उंची मोजली जाते. या माहितीची नोंद ‘पोषण ट्रकर’ प्रणालीमध्ये करण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांची राज्याची स्थिती

वर्ष                तपासणी            तीव्र कुपोषित

  मार्च 2024        4262652           51,475

  मार्च 2025        4810302           29,107

  मार्च 2026        4438048           13,321