
मुंबईतील मोकळी मैदाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत असून सर्व मोकळी मैदाने मातीचीच राहिली पाहिजेत, अशी ठाम भूमिका शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत यासंदर्भातील अशासकीय विधेयकावर बोलताना मांडली.
मुंबईतील मोकळी मैदाने (आरजी) आणि उद्यानांच्या (पीजी) जागा सरकारच्या धोरणात्मक त्रुटींमुळे घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. त्या वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. मोकळी मैदाने मातीचीच राहिली पाहिजेत, हे महत्त्वाचे आहे. या जागांबाबतची केअरटेकर पॉलिसी प्रलंबित असली तरी कोणती न कोणती ट्रस्ट कोणत्या ना कोणत्या मैदानावर आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी केअरटेकर पॉलिसी आणि आरजी-पीजी प्लॉट्सच्या हस्तांतरणावरून सरकारचे कान टोचले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शिनी पार्कचे उदाहरण दिले. प्रियदर्शिनी पार्क म्हणजे पीडीपीची स्वतःची ट्रस्ट आहे. तिथे केअरटेकर पॉलिसी आहे की नाही आणि कुठच्या निकषावर देणार याविषयी निर्णय घेतला पाहिजे. टर्फ परवानगी, फायर ऑडिट केले आहे की नाही हा विषयही आहे. जिथे जिथे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे, जिथे बिल्डर्स आणि कॉन्ट्रक्टर्स काम करत आहेत, त्यांच्याकडून रहिवाशांसाठीच्या सुविधा, आरजी किंवा पीजी प्लॉट्स वेळेत ताब्यात आले पाहिजेत. या प्राईम जमिनींच्या सुरक्षेसाठी रोड फेन्सिंग वेळेवर लावले गेले पाहिजे याचादेखील विधेयकात समावेश असावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.





























































