
शिंदे गटाचे हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केलेल्या दोन डॉक्टरांनी आज तडकाफडकी राजीनामे दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. गुंडगिरीमुळे असुरक्षित वातावरणात रुग्णसेवा करणे शक्य नसल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव सोळंकी यांनी नोकऱ्या सोडल्या. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र सुन्न झाले आहे. डॉक्टरांचे राजीनामे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दहशतीचे बळी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कल्याण, डोंबिवलीत उमटत आहेत.
शिंदे गटाचे नगरसेवक असल्यामुळे रमेश म्हात्रे यांना अटक करण्यासाठी पोलीसही धजावत नव्हते. शिंदे गटाच्या गुर्मीचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बुधवारी डोंबिवलीत धडकताच पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना बेड्या ठोकल्या. मात्र सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सना मारहाण झाल्यानंतरही राज्य शासन गंभीर नसल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मारहाणीच्या धक्क्यातून डॉक्टर, नर्स आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही सावरलेले नाहीत. मारहाण झालेले, दहशतीखाली असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळुंखे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर यांनी निषेध म्हणून आपल्या नोकरीचे राजीनामे दिले. सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारीच मानवतेची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना, महिलांना मारहाण करत असतील आणि उजळ माथ्याने फिरत असतील तर नोकरी कशासाठी करायची, अशा मनःस्थितीत अनेक डॉक्टर आहेत. त्यामुळे मारहाणीच्या घटनेला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
आम्ही मुलांना रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर केले, गावगुंडांचा मार खाण्यासाठी नाही, डॉ बाविस्कर यांच्या आईचा संताप
आम्ही आमच्या मुलांना रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर केले आहे, गावगुंडांचा मार खाण्यासाठी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्या आई संगीता यांनी दिली. डॉक्टर आणि नर्सवरील हल्ला हा असंविधानिक आहे. डॉक्टर ४८ ते ७२ तास अविरतपणे आपल्या रुग्णांची सेवा करत असतात हे समजून घ्या, असेही संगीता बाविस्कर हात जोडून म्हणाल्या.





























































