
महिला डॉक्टर आणि नर्सना अर्वाच्च शिवीगाळ करत बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी काँग्रेसच्या केडीएमसीतील गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. म्हात्रे यांच्या वर्तणुकीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. हिंसक प्रवृतीच्या रमेश म्हात्रेसोबत आता सभागृहात बसायचीसुद्धा भीती वाटत असून महिला नगरसेविकांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
रमेश म्हात्रे यांनी गुंडगिरी करत शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सना मारहाण केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. म्हात्रे यांच्या हिंसक वर्तणुकीवरून काँग्रेसच्या गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला.
महिलांवर हात उचलण्याची हिंमत कशी होते?
म्हात्रे यांची महिलांवर हात उचलण्याची हिंमत कशी होते, असा सवालही त्यांनी केला. प्रत्येक ठिकाणी जाऊन मारामारी करणारी व्यक्ती अशी रमेश म्हात्रे यांची प्रतिमा बनली आहे. अशा व्यक्तीसोबत महापालिकेच्या सभागृहात बसायलाही आम्हाला आता भीती वाटत असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली. म्हात्रे यांच्या वर्तनामुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेलाच तडा गेला असून महिला लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. लाडक्या बहिणींच्या सन्मानाची परतफेड कांचन कुलकर्णी यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ राबवत महिलांच्या सन्मानाच्या घोष-णा करतात तर दुसरीकडे त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाकडून महिलांना मारहाण व शिवीगाळ केली जाते. हीच का लाडक्या बहिणींच्या सन्मानाची परतफेड? सरकारची ही दुहेरी भूमिका महिलांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे, असेही कुलकर्णी म्हणाल्या.



























































