
सहलीला गेलेले हैदराबादमधील व्यावसायिक जोडपे स्वित्झर्लंडमध्ये बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पब्बा चंद्रशेखर (51) आणि स्वप्ना (42) अशी बेपत्ता झालेल्या जोडप्याची नावे आहेत. याप्रकरणी बेपत्ता जोडप्याच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. हे जोडपे गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम उकळल्यानंतर देश सोडून पळून गेले असावे, असा आरोप करण्यात येत असून पोलीस त्या दिशेनेही चौकशी करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रशेखर यांची मुलगी श्रेया हिने दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे 22 जून रोजी स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी रवाना झाले होते. सुरुवातीला ते नातेवाईकांच्या संपर्कात होते, परंतु 8 जुलैनंतर त्यांचा संपर्क तुटला. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद किंवा कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने, त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
दीर्घकाळ संपर्क न झाल्यामुळे चिंतेत असलेल्या त्यांच्या मुलीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत तपास सुरू केला आहे. हे जोडपे नेमके कुठे आहे आणि त्यांनी दावा केल्याप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश केला होता का, हे निश्चित करण्यासाठी तपास अधिकारी त्यांचा प्रवासाचा तपशील, इमिग्रेशन (स्थलांतर) नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करत आहेत.


























































