
850 खासदार झाल्यावर संविधानात बदल करून हिंदुस्थानात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा भाजपचा विचार आहे, देशातली लोकशाही संपवून या देशाच्या छातीवर राष्ट्राध्यक्षपदी मोदींना आणण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावाही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, एक देश एक निवडणुकीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमली असून त्यात भाजपचं बहुमत आहे. त्यात इतर पक्षांचे सदस्य आहेत, त्यांनी कितीही वेगळी भूमिका मांडली तरीही पाशवी बहुमत असल्याने भाजप आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. एक देश एक निवडणुकीची गरज नाही, हे आमचे मत आहे. या देशात विविधता आहे, राज्य वेगळी आहे, प्रत्येक राज्याचे जसे हवामान वेगळं असतं, मानसिकता वेगळी आहे, प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत. पण भाजपला एक देश एक निवडणुकीपेक्षा एक पक्ष एक निवडणुकीत जास्त रस आहे. देशात कुठलाही पक्ष राहता कामा नये याप्रमाणेच त्यांची जी वाटचाल सुरू आहे. आणि त्यानंतर महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे ज्यात 850 खासदार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, यातून देश ताब्यात घेण्याचा त्यांचा मानस आहे. 850 खासदार झाल्यावर संविधानात बदल करून हिंदुस्थानात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा त्यांचा विचार आहे. ट्रम्प ज्या मूर्खपणाने राज्य करत आहेत, तसेच आपल्या देशात माथेफिरू पद्धतीने त्यांना राज्य करायचे आहे. या पद्धतीत राष्ट्राध्यक्षाला अमर्यादित अधिकार असतात. तिथे निवडणुकांची गरजच नसते. राष्ट्राध्यक्ष आपल्याला हवी असलेली लोकं मंत्रिमंडळात नेमतो. निवडून आलेल्या लोकांमधूनच मंत्री बनवायचं अशी तरतूद यात नसते. भाजपची आताची वाटचाल याच दिशेने सुरू आहे. यासाठी त्यांच्या बैठका आणि काम सुरू आहे. त्यासाठी आधी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घ्यायचं, संविधान मोडून, या देशातली लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आणि परत या देशाच्या छातीवर राष्ट्राध्यक्षपदी मोदींना आणून बसवायचं. अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडून करण्यासाठी सुरू आहे. म्हणून एक देश एक निवडणूक हे वरवरचे बुडबुडे आहेत. आणि याला आमचा विरोध आहे. या देशात परंपरेने भारतीय घटनेनुसार जी पद्धत सुरू आहे, भारतीय संविधानाने जी दिशा लोकशाहीला दिलेली आहे. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो मार्ग आम्हाला दिलेला आहे तो मार्ग असा कुणालाही उखडून टाकता येणार नाही. या देशाच्या संविधानानुसारच या देशाची संसद लोकशाही आणि निवडणुकी होतील ही आमची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.
20 तारखेला संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. मेरिटवर पंतप्रधानपद किंवा मंत्रिपद मिळण्याचे दिवस संपले. आता हाडकं फेकली जातात. ज्यांच्या गळ्यात मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे, अशांपुढे ती हाडकं फेकली जातात. आता ही हाडकं कुणापुढे फेकली जातील, मिंध्यांचे खासदार, किंवा आमच्यातून फुटलेल्या खासदारांपुढे हे पाहू. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत. त्यात अर्थमंत्री बदलले जातील, कुणी म्हणतंय की परराष्ट्र मंत्री बदलले जातील, कुणी सांगितलं की राजनाथ सिंह यांनाच घरी पाठवले जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील असं सांगितलं जात आहे. फडणवीसांना आमच्या शुभेच्छा आहेत. 2029 पूर्वी जर फडणवीसांना पंतप्रधानपदासाठी संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल. उद्धव ठाकरे यांनीही यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कारण राज्यात 2029 नंतर भाजपचे राज्य येणार नाही. त्यामुळे जे काही करायचे आहे ते 2029 च्या आधी करायचे आहे. 2029 साली ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. त्यामुळे फडणवीसांनी 2029 पर्यंत ज्या हालचाली करायच्या आहेत त्या करून घ्याव्यात, अशा त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
जे लोक फोडण्याचे प्रयत्न करत आहेत, प्रचंड पैसे आहेत. पैसे हे त्यांच्या दरेगावाच्या शेतात उगवत नाहीत. ते पैसे मिसिंग लिंक आणि अडीच हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त बजेट हे लुटलेलेच पैसे आहेत. अशा पैश्यातून आमदार- खासदार विकत घेण्याचे त्यांचे धोरण आहे. आणि अशा प्रकारची माणसं फक्त राजकारणालाच नव्हे तर देशालाही घातक आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळ करणे म्हणजे हा आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही आजच महालेखापालांचा अहवाल पाहिला असेल, त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीवर अत्यंत कठोर शब्दांत कोरडे ओढले आहेत. ही आर्थिक बेशिस्त अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्राला यापुढे एक रुपयाही कर्ज कोणी देणार नाही. आता ही बाब विरोधी पक्षांनी तर सांगितलेली नाही, महाराष्ट्राची बदनामी आम्ही केलेली नाही. केंद्र सरकारचे महालेखापाल आहेत, त्यांनी ही महाराष्ट्राची बदनामी केली असेल. तर देवेंद्र फडणवीसांनी त्या महालेखापालांना बघून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जरी खरं असलं तरी महालेखापाल महाराष्ट्राविषयी असे कसे बोलू शकतात? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात येतील. मला जे चित्र दिसतंय त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे याक्षणी फडणवीस जर केंद्रात गेले तर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे देवेंद्र फडणवीसच करतील, हे माझं आकलन आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. जे राज्याचे हित पाहतील, जो राज्य योग्य दिशेने पुढे नेतील, आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणतीही व्यक्ती असेल त्यांना शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला माझा अंदाज आणि आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत. पण असं घडू शकेल असेही संजय राऊत म्हणाले.

































































