
स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला हरवून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. उपांत्य फेरीत संघाचा सामना बलाढय़ फ्रान्सशी होणार आहे, पण या हायव्होल्टेज सामन्यापूर्वीच दोन्ही संघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. स्पेनचा तरुण स्ट्रायकर लॅमिन यामालने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी फ्रान्सविरुद्ध होणाऱया उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी शाब्दिक युद्धाला सुरुवात करत, लॅमिन यामालने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना आमच्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. तो म्हणाला की, ‘माझ्या मते जर फ्रान्सला कोणाची भीती वाटायला हवी असेल, तर ती आमच्या संघाची वाटायला हवी. आम्ही त्यांना यापूर्वी मोठय़ा स्पर्धांमधून बाहेर काढले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.
स्पेन–फ्रान्स स्पर्धेत अपराजित
स्पेनने 2024 च्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत फ्रान्सला हरवले होते. गेल्या वर्षी नेशन्स लीगमध्येही त्यांनी फ्रान्सला पराभूत केले होते. तेव्हा यामाल या खंडीय स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. बेल्जियमविरुद्ध ‘सामनावीर’ ठरलेल्या यामालने सांगितले की, ‘‘आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे स्पष्ट आहे की, हा दोन महान संघांमधील सामना असेल. माझ्या मते दोन्ही देश सर्वोत्तम संघांपैकी एक आहेत. पुढे काय होते ते पाहूया.’’
























































