
पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत बिल्डरकडे अडकलेले पैसे परत मिळवून देऊ, तर कोणाला पोलीस भरती करून देऊ अशा बतावण्या करत अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसासह त्याच्या अन्य तिघा साथीदारांना मुंबई गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या.
मोहम्मद गौस इब्राहिम खतिब ऊर्फ डॉ. राज खातीब (52) हा वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून बनावट शासकीय ओळखपत्रे व कारमध्ये पोलीस लिहिलेली पाटी ठेवून आर्थिक फसवणूक करीत असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडे आली होती. त्याची दखल घेत पथकाने शोधमोहीम राबवीत राज खातीब याच्यासह राजेश चौधरी (46) या दोघांना अटक केली. या दोघांनी एका तक्रारदारास त्याचे बिल्डरकडे अडकलेले पैसे परत मिळवून देतो, असे सांगत 15 लाख 90 हजारांची फसवणूक केली होती. हे प्रकरणानंतर तिसरी व्यक्ती गुन्हे शाखेकडे गेली आणि सदर आरोपींनी ते वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पोलीस भरतीचे काम करून देतो अशी बतावणी करीत 12 लाखांची फसवणूक केली अशी तक्रार दिली.
























































