
>> डॉ. मंजिरी भालेराव ([email protected])
जुन्नरहून नाणेघाटाकडे जाणाऱया रस्त्यावर ‘तुळजादेवीची टेकडी’ या ठिकाणी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अवस्थेतील 13 शैलगृहांचा समूह दिसतो. हाच अल्पपरिचित असा ‘तुळजा लेणी समूह’.
महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शैलगृहे कोणती हे नक्की सांगणे जरी अवघड असले तरी विविध शैलगृहांचा अभ्यास करून विविध अभ्यासकांनी भाजे, जुन्नर येथील तुळजा लेणी, मुंबईतील कोंडिवते आणि महाकाली, जीवदानी अशा काही स्थळांमधील चैत्यगृहांना किंवा लेणींना त्यांच्या त्यांच्या मते सर्वात जुनी शैलगृहे असे मानले आहे. यामध्ये ब्रिटिश आणि भारतीय अभ्यासकांचा समावेश होतो. या चैत्यगृहांची रचना, त्यातील लाकडाचा वापर आणि लाकडी बांधकामाशी असेलेले साम्य या निकषांवरून यांचे पौर्वापर्य ठरवले गेले. बहुतेक अभ्यासकांनी भाजे येथील चैत्यगृह हे सर्वात जुने असावे असे मत मांडले. काहींच्या मते मुंबईतील विरार येथील जीवदानी येथील लेणे सर्वात जुने, तर काहींच्या मते जुन्नर येथील तुळजा लेणी समूहातील चैत्यगृह सर्वात जुने आहे. हा तुळजा लेणी समूह नेमका कसा आहे हे आज जाणून घेऊ.
पुणे जिह्यातील जुन्नर, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी या किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे, पण या शिवनेरी किल्ल्याच्या अगदी जवळ जुन्नरपासून साडेतीन कि.मी. अंतरावर असलेल्या तुळजा लेणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शैलगृहांच्या समूहाला मात्र फारशी प्रसिद्धी मिळाली नाहीये. ‘तुळजादेवीची टेकडी’ या नावाने या शैलगृहांची टेकडी ओळखली जाते, पण आज चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अवस्थेतील इ. स. पूर्व 1 ल्या शतकात निर्माण झालेली 13 शैलगृहे असलेली ही टेकडी मुख्य रस्त्यापासून थोडी बाजूला पाडळी गावाजवळ आहे. जुन्नरहून नाणेघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली ही टेकडी आणि त्यातील शैलगृहे तसे म्हटले तर व्यापारी मार्गाच्या अगदी जवळ आहेत. वर्षावासात उदरनिर्वाहासाठी जुन्नर गाव तसेच आजूबाजूच्या लहान वस्त्या यांचाही येथील भिक्षू समूहाला आधार असावा.
या शैलगृहांच्या निर्मितीसाठी कोणी दान दिले हे आज कळू शकत नाही. कारण या संपूर्ण समूहात एकही शिलालेख सापडला नाही. येथील लेणी चित्रांनी सजवली होती हे सांगणारे प्लास्टर आणि काही चित्रांचे अवशेष या स्वरूपाचे पुरावे आजही पाहायला मिळतात, पण या लेणी समूहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथले वृत्ताकार चैत्यगृह. आतापर्यंत आपण पाहिलेली चैत्यगृहे चापाकार रचनेची होती, पण हे मात्र पूर्णपणे गोल आकाराचे चैत्यगृह आहे. अशा प्रकारचे चैत्यगृह आंध्र प्रदेशातील एलुरू जिह्यातील गुंटुपल्ली येथेही पाहायला मिळते. बिहारमधील बराबार समूहातील लोमश ऋषी लेण्यासारखे मुखदर्शन असलेले हे गुंटुपल्ली येथील चैत्यगृह साधारणपणे इ. स. पूर्व दुसऱया शतकातील असावे असा अभ्यासकांचा कयास आहे, पण जुन्नर येथील तुळजा लेणी समूहातील चैत्यगृहाचे मुखदर्शन तुटले असल्याने ते नेमके कसे होते हे सांगणे अवघड आहे.
तुळजा लेणी समूहात भिक्षू निवास म्हणजे विहारही तसेच काही पाण्याची टाकीही निर्माण केली होती. त्यामध्ये काही खोल्यांमध्ये भिक्षूंना झोपण्यासाठी दगडी बाके कोरली आहेत. यापैकी अनेक विहारांच्या पुढच्या भागातील भिंती तुटल्या आहेत, पण त्या भिंतीच्या वरती असलेल्या मुखदर्शनाच्या शिल्लक राहिलेल्या भागात सुरेख कोरीव काम केलेले दिसते. चैत्य गवाक्षासारख्या कमानी, त्यांच्या शेजारी कोरलेले अर्धउठावातील स्तूप व बाजूने असणारे स्त्री आणि पुरुष भक्त अशा प्रकारचे शिल्पकाम इथे आहे. स्त्री आणि पुरुष भक्तांच्या व्यतिरिक्त अजून काही आकृती इथे दिसतात त्या म्हणजे मानव व पक्षी यांचे एकत्रीकरण करून तयार केलेले किन्नर. कमरेच्या वरचा भाग मानवाचा आणि कमरेच्या खालचा भाग मोराचा पिसारा असणारा असे यांचे चित्रण इथे दिसते. या किन्नरांच्या हातात फुले असावीत असे वाटते. भारहूत आणि सांची येथील स्तूपांवरील शिल्पांमध्ये असे किन्नर हातात फुलांचे हार घेऊन स्तूपाची पूजा करायला आलेले दाखवले आहेत. साधारण इ. स. पूर्व दुसऱया ते पहिल्या शतकातील बौद्ध कलेत अशा प्रकारचे मिश्र योनीतील किंवा अतिमानवी स्वरूपाच्या व्यक्ती दाखवण्याची पद्धत रूढ असावी असे वाटते. केवळ मर्त्य मानवच नाहीत, तर दुसऱ्या योनीतील व्यक्तीसुद्धा या स्तूपाची पूजा करायाला आलेल्या आहेत असे यातून सुचवायचे असावे असे वाटते. याशिवाय वेदिका आणि जाळी असेही नक्षीकाम या शिल्पपटात पाहायला मिळते. जुन्नर येथीलच मानमोडी टेकडीतील भूत लेणे या समूहातील विहारांच्या बाहेरील बाजूस साधारणपणे अशा चैत्य कमानी आणि वेदिका तसेच जाळी यांचा शिल्पात वापर करून सजावट केलेली दिसते. यावरूनही याचा काल इ. स. पूर्व पहिले शतक असा ठरवला गेला आहे. याव्यतिरिक्त एका विहारात मध्ययुगात तुळजा भवानीची एक मूर्ती कोरली गेली आणि त्यानंतर हे स्थळ तुळजा लेणी या नावाने ओळखले जाऊ लागले. तोपर्यत बौद्ध भिक्षूंनी हे स्थळ सोडले होते. त्यामुळे तिथे कोणताही संघर्ष झाल्याच्या खुणा किंवा दंतकथा आढळत नाहीत. शेवटचा विहार म्हणजे एक मोठा मंडप आहे, ज्याच्या तीनही भिंतीलगत दगडी बाक कोरला आहे.
बौद्ध कलेच्या सुरुवातीच्या काळात गौतम बुद्धाचे मानवी रूपात अंकन होत नसे हे आपण पाहिले होते. या लेणी समूहातसुद्धा गौतम बुद्धाची मानवी रूपातील मूर्ती किंवा चित्र आढळत नाही. नाणेघाटात जाणाऱया रस्त्याच्या जवळच असलेल्या या लेणी समूहाचे भौगोलिक स्थान आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाजवळ आणि एका अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी केंद्राजवळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जुन्नर परिसरातील टेकडय़ांमध्ये 180 पेक्षा जास्त बौद्ध लेणी कोरलेली आहेत, पण त्यापैकी सर्वात प्राचीन याच लेणी आहेत. येथील शैलगृह निर्मितीच्या कार्यालाच या समूहाच्या निर्मितीने सुरुवात झाली होती, यावरूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित होते. या लेणी समूहात असलेले दुर्मिळ वृत्ताकार रचना असलेले चैत्यगृह तितकेच महत्त्वाचे आहे. या रचनेचे चैत्यगृह परत कधी तयार झाले नाही. त्याचीही नेमकी कारणे आज कळणे अवघड आहे, पण यामुळे कोण्या एका विशिष्ट बौद्ध संप्रदायाचे अस्तित्त्व तर हे चैत्यगृह आणि तेथील काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचे विहार सुचवत नाही ना, असाही विचार करावा लागतो. पण फारशी चर्चा न होणाऱ्या या लेणी समूहाने महाराष्ट्रातील बौद्ध लयन स्थापत्याच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा जतन करून ठेवला आहे हे मात्र यातून लक्षात येते.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

























































