
>> प्रसाद साडेकर
हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार कै. मदनमोहन यांचा मंगळवारी (14 जुलै) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने आदरांजली म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा.
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळात अनेक महान संगीतकार होऊन गेले. काही हयात आहेत. शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, खय्याम, ओ. पी. नय्यर, जयदेव अशी कितीतरी नावे आहेत. या जगात काही माणसं अशी असतात की, परमेश्वरानं जणू खास त्याचकरिता जन्माला घातले असे वाटते. उदा. लतादीदी, पं. रवी शंकर, पं. भीमसेनजी, अब्दुल कलाम, जयंत नारळीकर आणि ज्यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा लेख लिहीत आहोत, ते गझलकिंग ‘संगीतकार मदनमोहनजी.’
हृदयाला पीळ पाडणाऱ्या एकापेक्षा एक सुरेख गझला त्यांनी संगीतबद्ध केल्या. मदनमोहन यांचा जन्म बगदाद येथे झाला. मदनमोहन यांची सांगीतिक कारकीर्द सुरू होण्याआधीची नोकरी ही ब्रिटिश लष्करामध्ये होती. वयाच्या अवघ्या 19 क्या वर्षी ब्रिटिश लष्करात ते कमिशन्ड ऑफिसर म्हणून दाखल झाले. अर्थात कारणही तसेच होते. मदनमोहन यांचे वडील रायबहादूर हे इराकी पोलीस दलात अकाऊंटंट जनरल या मोठय़ा हुद्यावर होते. त्यांची इच्छा होती की, आपल्या मुलानेही लष्कारात नाव कमवावे, पण त्यांना ते अजिबात माहिती नक्हते की, मुलाच्या मनात बंदुका, तोफ नाही, तर राग-रागिण्यांची सुरेख गुंफण गुंफणे चालू आहे. म्हणूनच बंगळुरू येथे लेफ्टनंट असतानाच हृदयावर दगड ठेवून मनाची घुसमट सहन न झाल्यामुळे मदनमोहन यांनी नोकरी सोडली आणि ऑल इंडिया रेडिओवर दाखल झाले. तेथे रुजू झाल्यानंतर मोठमोठ्या कलावंतांशी त्यांची ओळख झाली, पण दिल्लीला बदली होणार होती म्हणून मुंबईला येणे पसंत केले.
मदनमोहन यांचा रागदारीचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे हे अविस्मरणीय आहे. सतार, सारंगी या तंतूवाद्यांचा आणि बासरीचा त्यांच्या संगीतात नितांत सुंदर वापर व सांगड असे. त्यांची गझल कानात रुंजी घालते, मनाला अस्वस्थ करते, हृदयाला पीळ पाडते. प्रत्येक संगीतकाराला काही वर्षे अनुभवी संगीतकाराबरोबर काम करावेच लागते, जेणेकरून त्यांना प्रशिक्षण मिळते, संस्कार होतात. मदनमोहन यांनीदेखील सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून काम केले.
स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी त्यांना मिळाली. मखमली आवाज लाभलेले तलत मेहमूद, महंमद रफी, मुकेश, गीता दत्त, मन्नाडे, भूपेंद्र यांच्या आवाजाचा त्यांनी इतका सुरेख वापर केला की, जणू हे गाणं दुसऱ्या गायकांनी किंवा गायिकेने गायलं तर इतकं अपील झालं नसतं असंच वाटायचं. हे सर्व असूनही त्यांच्या खऱया तारा जुळल्या त्या लतादीदींशीच. कोणत्याही संगीतकाराने इतक्या गझला आपल्या जादुई संगीताने अजरामर करून ठेवल्या असतील असे उदाहरण हिंदी चित्रपटसृष्टीत दिसत नाही. ज्या मदनमोहन यांनी प्राण ओतून संगीतबद्ध केल्या आहेत. अर्थात त्याकाळी सकस गझला लिहिणारे गीतकार, तासन्तास रियाज करणारे गायक/गायिका अन् 16/16 तास संगीत देणारे संगीतकार व त्यांचे सहकारी होते, समर्पण होते. छोटय़ा छोटय़ा सुरेल हरकती ही मदनमोहन यांच्या सुरांची श्रीमंती जणू लतादीदींसाठी आहे असेच वाटत असे. गझला ऐकताना मनातील बेचैनी, उदासी, एकटेपणा याचे वादळ अन् सुरांच्या श्रीमंतीतून रसिकांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू आणणारा एकमेव संगीतकार म्हणजे मदनमोहनजी होय. लतादीदी आणि इतर गायकांची काही गाण्यांची यादी पाहिल्यास मदनमोहनसाहेबांच्या उत्कृष्ट दर्जाच्या संगीताचा अनुभव येतो. ‘जरासी आहट होती है, तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं’ – हकिकत, ‘रस्म-ए- उल्फत को निभाऐ, तो निभाऐ कैसे’ – दिल की राहें, ‘बैय्या ना धरो ओ बलमा’ – दस्तक, ‘आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे’ – अनपढ, ‘वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं’ – जहाँआरा, ‘उनको ये शिकायत है, के हम कुछ नहीं करते’ – अदालत, त्यांनी मोहम्मद रफीसाहेब, मुकेशजी आणि तलत महमूदजी यांच्या आवाजालाही अतिशय सुरेख न्याय दिला. मुकेश यांचे ‘संजोग’मधील ‘भुली हुई यादों’ हे राग यमनवरील गीत, तसेच तलत महेमुद यांच्याकडून ‘मदहोश’, ‘जहाँ आरा’ या चित्रपटांमधील गीते आजही हृदयाला पीळवटून टाकणारी आहेत. मन्नाडे यांच्या आवाजातील ‘देख कबीरा रोया’ या चित्रपटातील ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ हे अवीट गीत आजही तितकेच टवटवीत आहे. गीता दत्त यांनी गायिलेले ‘ऐ दिल मुझे बता दे’ हे गाणं आजही जवळपास प्रत्येक वाद्यवृंदात गायले जाते. रफीसाहेबांनी गायिलेली अनेक अवीट गीते आहेत. त्यात ‘चिराग’मधील ‘तेरी आँखों के सिवा दुनिया में रख्खा क्या है’ तसेच ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’, ‘हिररांझा’, ‘मेरा साया’सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले आहे. केवळ 51 वर्षे इतक्या अल्पकाळाचे आयुष्य या महान संगीतकाराला लाभले आणि आजच त्यांचा 51 वा स्मृतीदिन आहे हाही एक योगायोगच. जोपर्यंत भारतीय हिंदी चित्रपटसृष्टी आहे, तोपर्यंत त्यांची गाणी आणि गझला रसिक चिरकाळ ऐकतील.



























































