दिव्यात चाळमाफियांना रान मोकळे, सहाय्यक आयुक्त नागरगोजेंना निलंबित करा; शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिव्यात चाळमाफियांना रान मोकळे असून मोठ्या प्रमाणावर सर्वत्र बेकायदा चाळी उभारण्याचे पेव फुटले आहे. ठाणे पालिकेकडे वारंवार तक्रारी, अर्ज करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई अद्यापी केली नाही. येथील बेकायदा बांधकामांमुळे दिव्याची वाट लागली असून नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. माफियांवर कारवाई करण्यास चालढकल करणारे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे.

दिव्यातील बेकायदा बांधकामांबाबत शिवसेनेने अनेकदा आवाज उठवला आहे. स्थानिक नागरिक तसेच विविध संघटनांनादेखील पालिकेकडे तक्रारी केल्या, पण बेकायदा बांधकामांचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला अपयश आले. या बांधकामांना दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी निवेदनाद्धारे केली आहे.

नियमांची पायमल्ली

अनधिकृत बांधकामांमुळे शहर नियोजन, नागरिकांची सुरक्षितता आणि महापालिकेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.