
दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आणि त्या ठिकाणी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कॉमेडीयन कुणाल कामराला सर्वोच्च न्यायालयाच्या वकील अमिता सचदेव यांनी नोटीस पाठवली आहे.
आपल्या याच भाषणात कुणाल कामरा म्हणाला होता की, ‘‘ये सीता के पती का नाम ले रहें है और नीता के पती का काम कर रहे हैं.’’ नेमक्या याच वाक्यामुळे कुणाल कामराच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कुणाल कामराने हा व्हिडीओ डिलीट करावा आणि तातडीने माफी मागावी अशी मागणी या वकिलाने केली आहे. कुणाल कामराने खुशाल सरकारवर टीका करावी. त्याबाबत माझा आक्षेप नाही. कुठल्याही विषयावरून सरकारवर केलेली टीका किंवा केलेले विधान हे मी समजू शकते, पण देव ही पवित्र भावना आहे. आमच्या देवाचे नाव बदनाम करायचे नाही. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळेच कुणाल कामराने जाहीर माफी मागितली पाहिजे, वक्तव्य सोशल मीडियावरून हटवले पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत, असे अमिता सचदेव यांनी म्हटले आहे.


























































