
प्रसिद्ध ‘लोणावळा चिक्की’ आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूर गडावरील पारंपरिक ‘रेणुकामाता तांबूल’ यांना भौगोलिक मानांकनाचा (जीआय टॅग) बहुमान मिळाला आहे. ऐतिहासिक वारसा, खाद्यसंस्कृती आणि समृद्ध परंपरेचा गौरव करणाऱ्या दोन नव्या पदार्थांमुळे महाराष्ट्रातील जीआय टॅगची संख्या आता पन्नासपर्यंत पोहोचली आहे.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. ऐतिहासिक कागदपत्रे, उत्पादनाची वैशिष्ट्ये, परंपरा आणि त्या भागाशी असलेले भौगोलिक नाते यांचा सखोल अभ्यास करून अर्ज सादर करण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. लोणावळा चिक्की आणि माहूर तांबूलला जीआय टॅग मिळाल्याने महाराष्ट्रातील जीआय उत्पादनांची संख्या 50 झाली आहे. यापूर्वी राज्यातील अनेक प्रसिद्ध कृषी, हस्तकला आणि खाद्यपदार्थांना जीआय मानांकन मिळाले आहे. भौगोलिक मानांकन तज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. लोणावळा चिक्की संघ आणि माहूर येथील मंदिराचे पुजारी व तांबूल विव्रेते या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते.




























































