रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी सोनम वांगचूक यांना अटक, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन हे अराजकीय, भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही सामील व्हावे; असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही दडपशाही आहे, ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक 21 दिवस उपोषण सुरू ठेवले, त्या प्रश्नाचा निकाल लागलेला नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून वांगचुक यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांचा राजीनामा घेतला नाही, आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी द्यायला तयार असलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जोरजबरदस्तीने उचलून इस्पितळात दाखल केलं. हा देश हुकुमशाही मार्गाने चाललेला आहे. वांगचुक यांच्या प्राणांची तुम्हाला किंमत असती तर उपोषण सुरु झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती. सरकारने ती भूमिका घेतली नाही. सोनम वांगचुक यांच्यावर दडपशाही करण्याचे दुसरे कारण असे की आज नागपुरात हिंदुत्वावादाचा जी धडक आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जो राम मंदिर देणगी घोटाळ्याविरोधात एल्गार आहे, त्या कार्यक्रमाचे लक्ष वळवावं म्हणूनच सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाहीने मार्गाने अटक करून इस्पितळात नेलं. तरी आता उद्धव ठाकरे निघालेले आहेत, ते 12 वाजता नागपुरात पोहोचतील. आणि 4 वाजता राम नगर राम मंदिराकडे रवाना होतील, असे संजय राऊत म्हणाले.

नागपुरातल्या या कार्यक्रमाला आम्ही अराजकीय मानतो. अयोध्येतही राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन केले ते ही आम्ही अराजकीय मानतो. त्याच प्रमाणे अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्यासाठीचे आंदोलन अराजकीय आहे. जे जे रामभक्त आणि हिंदूंनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत, रामभक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आमंत्रित केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

संघाचे तत्कालीन सरसंघचालकांच्या हस्ते मूर्तीची पूजा अर्चा झाली असतील तर त्याच मूर्तीची आम्ही पूजा करणार आहोत. त्यासाठीच आम्ही संघ मुख्यालयात आम्ही आमंत्रण दिले आहे. भाजपचा राम आणि हिंदुत्व वेगळा आणि आमचे वेगळे असे नाही. राम एकच असून या राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. आणि अयोध्येत रामासाठी ही लढाई झाली, त्यात आम्ही सगळेच आघाडीवर होतो, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस येत आहे, त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन देशाचे नेतृत्व करावे. त्यासाठी जर त्यांनी यज्ञ केला असेल तर त्या यज्ञाइतकीच ताकद आमच्या शुभेच्छांमध्ये आहे.

सोनम वांगचुक यांनी जेव्हा उपोषण सुरू केलं तेव्हा एक शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. सरकारने 21 दिवस त्यांच्या शरीराची झीज होऊ दिली. त्यांचे अवयव निकामी होण्याची वेळ आली आहे. आता त्या शिक्षणमंत्र्यांना दूर करण्याऐवजी, सोनम वांगचुक यांना अटक करून त्यांना रुग्णालयात दाखल केलं, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.