
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवरून आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “इतका अहंकार चांगला नसतो. इतिहास साक्षीदार आहे, ज्यांनी अहंकार केला त्यांचा शेवटी विनाश झाला,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात केजरीवाल म्हणाले, “मोदीजींना माझी विनंती आहे की, इतका अहंकार बाळगू नका. इतिहास सांगतो की, ज्यांनी सत्तेच्या जोरावर अहंकार केला त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली.”
वांगचुक यांना चुकीच्या पद्धतीने नेल्याचा आरोप
केजरीवाल यांनी आरोप केला की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून अत्यंत चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांना पाठवून त्यांना चारही बाजूंनी चादरीने झाकण्यात आले. त्यांचे उपोषण मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांशी गैरवर्तन, धक्काबुक्की आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
गांधीजींच्या उपोषणाची आठवण
या घटनेची तुलना महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील उपोषणाशी करत केजरीवाल म्हणाले, “गांधीजींनीही अनेक दीर्घ उपोषणे केली होती. मात्र, त्यावेळी ब्रिटिशांनीही अशी वागणूक दिली नव्हती. आपण यासाठी लढलो होतो का की, एक दिवस आपलेच सरकार नागरिकांशी असे वागेल?”
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त
केजरीवाल यांनी सांगितले की, सोनम वांगचुक आणि आंदोलन करणारे विद्यार्थी शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणालीतील सुधारणांची मागणी करत आहेत. “ही आपल्या देशातील मुले आहेत. त्यांच्याशी गैरवर्तन करणे योग्य नाही. ते केवळ चांगली शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी थांबवणे आणि पारदर्शक परीक्षा प्रणालीची मागणी करत आहेत,” असे ते म्हणाले.
सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी आंदोलन निष्फळ ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “या मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी सरकारचे संपूर्ण लक्ष आंदोलन अपयशी ठरवणे, त्याची बदनामी करणे आणि आंदोलकांचा अपमान करण्यावर केंद्रित आहे,” असा आरोप केजरीवाल यांनी केला. याशिवाय, “मोदीजींनी आज अहंकारातून सोनम वांगचुक यांचा अपमान केला. त्यांच्याशी संवाद साधणे हा योग्य मार्ग होता,” असेही केजरीवाल यांनी नमूद केले.
आज सोनम वांगचुक, अभिजीत दीपके और ये सारे युवा आपके बच्चों के भविष्य के लिए लड़ रहे हैं।
अब घर बैठने से काम नहीं चलेगा। अब सबको एक होकर सड़कों पर उतरना होगा। तभी इस देश में कुछ बदलेगा।
उठो, चलो जंतर मंतर। pic.twitter.com/9FS91uVVTW
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 18, 2026


























































