
माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या उंबरणेवाडीतील बाळंतिणीला आपल्या नवजात बाळासह परतीचा प्रवासही झोळीतूनच करावा लागला आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मनीषा पारधी हिला प्रसूतीनंतर झोळीतून पुन्हा गावात आणले. नातेवाईकांना भरपावसात निसरड्या रस्त्यावरून सुमारे पाच किलोमीटरचा प्रवास करत घर गाठावे लागले. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असला तरी उंबरणेवाडीतील ग्रामस्थांचे भोग संपण्याचे नाव घेत नाहीत. प्रशासनाने या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रोजगारासाठी त्यांना दररोज तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.































































